महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ मार्च । रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 14 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियासारख्या बलाढ्य देशाला युक्रेनचे सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. याला कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की हे सातत्याने आणि खंबीरपणे तिथे उभे होते. मात्र आता ते कच खाऊ लागले आहेत असे दिसते. झेलेन्स्की यांनी नाटोबाबत मोठे विधान केल्यामुळे रशियापुढे युक्रेन झुकतोय की काय अशी परिस्थिती आहे.
ज्या नाटोच्या जिवावर झेलेन्स्की यांनी रशियाला डिवचण्याचे पाऊल उचलले त्याच युरोपियन देशांच्या संघटनेने अर्थात नाटोने युद्धादरम्यान आपली हतबलता दाखवत प्रत्यक्ष युद्धात सहभागी होणार नाही असे म्हटले. त्यामुळे आता युक्रेनच्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी झेलेन्स्की यांनी युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नाही असे म्हटले आहे. तसेच रशियाने मान्यता दिलेल्या दोनेत्स्क आणि लुहान्स या दोन देशांच्या मान्यतेबाबतही विचार करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी म्हटले. पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी या दोन क्षेत्रांनी स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती.
झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे टीव्ही चॅनेल एबीसीला सोमवारी रात्री एक मुलाखत दिली. यात त्यांना नाटो आणि रशियाने दोन स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेल्या युक्रेनच्या दोन भागांवरही दिलखुलास चर्चा केली. या मुलाखतीवरून युक्रेन रशियापुढे गुडघे टेकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय म्हणाले झेलेन्स्की?
झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे युक्रेन नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी जोर लावणार नाही असे म्हटले. तसेच नाटोच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, मला हे पक्के कळाले आहे की नाटो आम्हाला त्यांच्यात सहभागी करून घेणार नाही. त्यामुळे मी देखील ती गोष्ट आता सोडून दिली आहे. नाटो वादग्रस्त गोष्टी आणि रशियाविरुद्द उभे रहायला घाबरतेय असा चिमटाही त्यांनी काढला.
…तर सैन्य कारवाई थांबवू
युक्रेनने आमच्या अटी-शर्ती मान्य केल्या तर युद्ध आणि सैनिकी कारवाई तत्काळ थांबवू असे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनने आपल्या संविधानामध्ये बदल करून हे स्पष्ट करावे की ते कोणत्याही गटाचा भाग होणार नाही. तसेच 2014 मध्ये रशियाचा भाग असणाऱ्या क्रिमियाला आणि रशियाने मान्यता दिलेल्या दोनेस्क आणि लुहान्सला स्वतंत्र देशाची मान्यता द्यावी, असेही रशियाने म्हटले आहे.