देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा ! “बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ मार्च । राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपानं नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढला असून यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली.

“कुणाच्या दाढ्या कुरवाळताय?”
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून निशाणा साधला. “जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

“शरद पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल, सोडून द्या. पण एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, अशी व्यक्ती तुमच्यासोबत मंत्रिमंडळात होती. तेव्हा काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. पण काय करणार, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की राजीनामा घेतला, तर माझं सरकार जाईल”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *