महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । येत्या काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शाश्वत विकासावर भर देणारा राज्य सरकारचा अर्थसंकल्प असेल, तशा तरतुदी यातून दिसतील अशी शक्यता आहे.
शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हा नियोजनामध्ये पर्यावरणीय बदल व नावीन्यपूर्ण योजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यास २०० कोटी, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास १० कोटींप्रमाणे १०० कोटी व महानगरास १० कोटी, नगरपालिकांना एकूण ३० कोटी निधी, तसेच जिल्हास्तरीय मध्यवर्ती प्रकल्पास ४० कोटी, जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी ५ कोटींप्रमाणे २० कोटी अशी विभागणी होवू शकते.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. अर्थसंकल्पात काय असेल याचा कानोसा घेतला असता शहरी विकास पर्यावरण यासह शाश्वत विकासावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्रात पुरुषाला १ रुपया रोजगार मिळत असेल तर महिलांना ७७ पैसे मिळतात. यात समान वेतन अंमलबजावणीची घोषणा होऊ शकते.
या तरतुदीची शक्यता
– गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी ३ कोटी.
– महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी राज्याचा हिस्सा म्हणून २००० कोटी.
– कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन
– पंढरपूर मंदिर सुधारणेसाठी विकास आराखडा ७३.८० कोटींचा असून त्याची पुढील ५ वर्षांत अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामुळे या वर्षीसाठी १३.५३ कोटी तरतूद.
– अष्टविनायक मंदिर या ठिकाणी भाविकांसाठी सुविधा उभारणार
– महिला धोरण नव्याने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना सहभागी करत अंमलबजावणी मजबूत करणे.