तळेगावच्या तळ्यातील बेकायदा खोदकामाप्रकरणी होणार कठोर कारवाई – प्राजक्त तनपुरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र 24 – विशेष प्रतिनिधी- दि.11

आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर नगरविकास राज्यमंत्र्यांचे उत्तर

आमदार शेळके यांनी तळे खोदकामाच्या भ्रष्टाचाराबाबत विधानभवनात आवाज उठविला

 

तळेगाव दाभाडे, 11 मार्च – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये तळ्यातील माती, मुरुम, गौण खनिजाच्या बेकायदा खोदकामाप्रकरणी संबंधितांविरुद्ध कार्यवाही सुरू असून सुनावणीसाठी सूचनापत्र देण्यात आले आहेत. या प्रकरणी तातडीने सुनावणी पूर्ण करून दोषी ठरणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत केली.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी याप्रकरणी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक तळे उत्खनन अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आमदार शेळके सुमारे दीड वर्षे पाठपुरावा करीत होते. तळेगाव येथील देवराई संस्थेने बेकायदा उत्खनन करून गौण खनिजांची परस्पर विक्री करीत 79 कोटी 64 लक्ष रूपये 94 हजार रुपयांचा महसूल बुडवल्याच्या प्रकरणी स्वतः आमदार शेळके यांनी जुलै 2020 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. उपविभागीय अधिकारी मावळ, कार्यकारी अभियंता जलसंधारण पुणे, तहसीलदार मावळ या अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून तब्बल सातशे पानांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. मात्र अजून त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने आमदार शेळके यांनी थेट विधानसभेत या विषयाला वाचा फोडली. शासन या प्रकरणी काय कार्यवाही करणार, किती दिवसात प्रकरण निकाली काढणार ? व कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांचा पैसा वसुल करणार का,असा सवाल यांनी उपस्थित केला.

नगरविकास राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरातील तलावामधून जलपर्णी व गाळ काढण्याकरिता आवश्यक प्रक्रिया न करता कामे करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याव्यतिरिक्त जानेवारी 2018 ते जून 2019 या कालावधीत, या ठिकाणच्या तळयामधील गाळ/माती काढणे व अन्य संबंधित कामांसाठी केलेल्या खर्चाबाबत झालेल्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार या अनियमिततांना जबाबदार सर्व संबंधितांबाबत आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी शासन स्तरावरून कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

या प्रकरणी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे व प्रारूप दोषारोपांच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांविरूध्द त्यांच्या जबाबदारीच्या अनुषंगाने या प्रकरणी दोषारोप अंतिम करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून त्यांच्या विरूध्द विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच, संबंधित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचेविरूद्ध महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम, 1965 च्या कलम 55 व कलम 42 अन्वये कार्यवाहीसाठी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यासाठी 30 मार्च रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीत सर्वांची बाजू ऐकुन न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून निकालाअंती दोषी ठरणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे तनपुरे यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये तळयातील गाळ/माती उत्खनन कामाबाबत गाव कामगार तलाठी तळेगाव दाभाडे यांनी अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी 2 लाख 376 ब्रास मुरूम/माती उत्खनन करून वापर केल्याचे सिध्द झाल्याने, या मालाची रॉयल्टी प्रती ब्रास 400 रुपये प्रमाणे 5 पट दंड आकारुन एकूण रक्कम 79 कोटी रुपये शासन जमा करण्याबाबत मावळच्या तहसिलदारांनी आदेश पारित केले आहेत.

या 79 कोटी 64 लाखांच्या दंडाबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले आहे. या अपीलाबाबत कार्यवाही सुरु असून अद्याप अंतिम आदेश न झाल्याने या दंडाची रक्कम भरलेली नाही. हे प्रकरण महसूल विभागासंबंधित असले तरी यात नगरपरिषदेचे नुकसान होत असल्याचे आढळल्यास नगरविकास विभागाकडून कारवाई केली जाईल, असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *