महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । देशभरात तुळजाभवानी मातेचे भक्त वसलेले आहेत. देशासह परदेशातील भक्तांनाही थेट दर्शन घेण्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भक्तांच्या सोयीसाठी सकाळीच ७.३० नंतर रोजची माहिती, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच संस्थानच्या http:/shrituljabhavani.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत. चार-पाच दिवसांत ही सुविधा सुरू झाली असून ११ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत याचे ७२१८ फॉलोअर्स तयार झाल्याचे समोर आले.
तुळजापुरातील कुलदैवत देवी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नियमित गर्दी वाढत चालली आहे. अशात सर्वांनाच नियमित दर्शनाला येणे शक्य होत नाही. त्यात देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह तेलंगण, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशसह अन्य राज्यांतून भाविकांची मोठी गर्दी असते. त्यांच्यासह इतर सर्वच भक्तांना देवीचे ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर विशिष्ट सणावारानिमित्त देवीची अलंकार पूजा करण्यात येते. त्या वेळी भक्तांना देवीच्या मनमोहक अलंकार पूजाही दिसत नाहीत. अनेकांचा हिरमोड होतो. त्यामुळे दिवेगावकर यांच्या कल्पनेतून सर्व भक्तांना देवीचे दर्शन घेण्याची सुविधा सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी देवीची आरती आणि अलंकार पूजा झाल्यानंतर लगेच संस्थानकडून नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकृत छायाचित्रकार देवीच्या रोजच्या अलंकार पूजेचा व्हिडिओ आणि फोटो काढून संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना पाठवण्यात येतात. त्यानंतर शितोळे यांच्या माध्यमातून सर्व सोशल मीडियावर पाठवण्यात येते. त्याचबरोबर एकटे शितोळे यांच्या भ्रमणध्वनीहून ३०० पेक्षा जास्त भाविक, माध्यम प्रतिनिधी, अधिकारी, पुजारी यांना पाठवण्यात येतात. त्यानंतर पुन्हा ज्यांना व्हिडिओ पाठवले, त्यांच्याकडून अधिक व्हायरल करण्यात येतात. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत या व्हिडिओ, फोटोंना सोशल मीडियावर अधिक पसंती मिळत आहे.