रशियन सरकारकडून निधी पुरवला जाणारी माध्यमे जगभरात ब्लॉक ; यूट्यूबचा मोठा निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १२ मार्च । रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनवर अजूनही हवाई हल्ले तसेच बॉम्बहल्ले केले जात आहेत. रशियाच्या या भूमिकेमुळे नेटोसह अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असून वेगवेगळे निर्बंध लादून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, जगभरात प्रसिद्ध असलेल्या यूट्यूब या व्हिडीओ स्ट्रिमिंग मंचानेही रशियन सरकारतर्फे निधी पुरविला जाणाऱ्या सर्व माध्यमांची स्ट्रिमिंग बंद करुन त्यांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यूट्यूबच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

यूट्यूबने रशियन सरकारकडून निधी पुरविला जाणाऱ्या सर्वच माध्यमांवर जगभरात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत रशियाच्या हिंसक कारवायांना नाकारणारे सर्व व्हिडीओ कन्टेंट काढून टाकले जाणार आहे. तर अशा माध्यमांचे जगभरात कोठेही स्ट्रिमिंग केले जाणार नाही, असे यूट्यूबने सांगितले आहे. याआधी यूट्यूबने युरोपमध्ये रशियाच्या आरटी आणि स्पुतनिक या दोन चॅनेल्सना ब्लॉक केले होते. यूट्यूबच्या या निर्णयाचा स्पुतनिक या रशियन माध्यमाने निषेध व्यक्त केलाय. हा निर्णय म्हणजे माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असं स्पुतनिकने म्हटलंय.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा १७ वा दिवस आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून या चर्चा सकारात्मकपणे झाल्याचं युक्रेनने म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे आर्थिक तसेच इतर मार्गांनी कोंडी व्हावी म्हणून जागतिक पातळीवर रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात येत आहेत. अमेरिकेने रशियाकडून तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशियाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. रशियाने २७ फेब्रुवारीला युक्रेनमधील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या प्रदेशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केल्यानंतर या दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *