महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । देशातील नागरिक, त्यांची इच्छा असल्यास, आगामी जनगणनेमध्ये ऑनलाइन स्व-गणना करू शकतील. कारण जनगणनेच्या वेळापत्रकात सरकारने सुधारणा केल्यामुळे ही सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. पण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नोंदणीसुद्धा सुरू राहणार आहे.
याबद्दलची अधिक माहिती गृहमंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री देण्यात आली आहे. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाइन स्व-गणनेच्या तरतुदीला परवानगी देण्याव्यतिरिक्त, जनगणनेची माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जाण्याचं काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. जनगणनेचा गृहनिर्माण सूचीचा टप्पा आणि NPR अपडेट करण्याची प्रक्रिया १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत देशभरात होणार होता, परंतु कोरोनाच्या उद्रेकामुळे ती पुढे ढकलली गेली.
आधीच्या वेळापत्रकानुसार, १ मार्च २०२१ जनगणनेची संदर्भ तारीख होती आणि जम्मू आणि ती काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १ ऑक्टोबर २०२० होती. जनगणनेचे काम अद्याप खोळंबलेलेच आहे. अद्याप नवीन वेळापत्रक सरकारने जाहीर केलेले नाही. नवीन नियमांमध्ये स्व-गणनेची व्याख्या स्वत: प्रतिसादकर्त्यांनी जनगणना वेळापत्रक भरणे, पूर्ण करणे आणि सबमिट करणे, अशी केली आहे.