महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) 2022 चा सिजन सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोठी घोषणा केली आहे. आरसीबी संघाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिस याला संघाचे कर्णधारपद दिले आहे. आता प्लेसिस आरसीबी संघाचे नेतृत्व करणार आहे. एका कार्यक्रमात शनिवारी याची घोषणा करण्यात आली. तसेच यावेळी संघाची नवी जर्सीही लॉन्च करण्यात आली.
विराट कोहली याआधी आरसीबी संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, गेल्या वर्षी त्याने कर्णधारपद सोडले. त्यामुळे संघाने आता प्लेसिसकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ या सिजनमध्ये मैदानात उतरणार आहे. आरसीबीने मेगा ऑक्शनमध्ये फाफ डू प्लेसिसला 7 कोटींमध्ये संघात घेतले होते. बंगळुरुत एका कार्यक्रमात आरसीबीच्या कर्णधारपदाची घोषणा करण्यात आली. या वेळी क्रीडारसिक उपस्थित होते.
विराट कोहलीच्या चाहत्यांनी पुन्हा कोहलीकडेच कर्णधारपद देण्याची मागणी केली. आरसीबीने याआधी दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स यांना संघाचा मेंटर बनण्याची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये प्लेसिसचा रेकॉर्ड बघता तो सर्वाधिक काळ चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. आयपीएल करियरमध्ये त्याने 100 सामने खेळले असून 2935 धाव केल्या आहेत. त्यात 22 अर्धशतक असून त्याची सरासरी 34.94 आहे. आयपीएलमध्ये आरसीबीने एकदाही विजेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली विजेतपद मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
आतापर्यंतचे आरसीबीचे कर्णधार आणि त्यांची कामगिरी
विराट कोहली- एकूण सामने 140, विजय 64, पराभव 69
अनिल कुंबले- एकूण सामने 26, विजय 15, पराभव 11
डेनियल विटोरी- एकूण सामने 22, विजय 12, पराभव 10
राहुल द्रविड़- एकूण सामने 14, विजय 4, पराभव 10
केविन पीटरसन- एकूण सामने 6, विजय 2, पराभव 4
शेन वॉटसन- एकूण सामने 3, विजय 1, पराभव 2