महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । आर्थिक वर्ष 2020-21 साठी 31 डिसेंबर पर्यंत प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. तरी देखील अनेकांना रिटर्न दाखल करता आला नाही. तुम्ही देखील दाखल केला नसेल तर 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
प्राप्तिकर अधिनियम कलम 139 (1) नुसार मर्यादित कालावधी पर्यंत आयटीआर भरला नसेल तर कलम 234A अंतर्गत दंड भरावा लागतो. त्यामुळे 31 मार्च 2022 पर्यंत पाच हजार रुपये दंडासह तुम्ही आयटीआर दाखल करू शकता.
करदात्याचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल. जर उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर दंड न भरताही आयटीआर दाखल करता येईल.
विलंब शुल्कासह आयटीआर दाखल केल्याने तुम्हाला नोटीस येणार नसली तरीदेखील 31 डिसेंबर पर्यंत रिटर्न दाखल न केल्याने तुमचे नुकसान होणार आहे. प्राप्तिकर नियमानुसार निर्धारित दिनांकापूर्वी आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला झालेले नुकसान तुम्ही पुढील आर्थिक वर्षात ‘कॅरी फॉरवर्ड’ करू शकता. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षात तुम्हाला कर सवलत मिळवता येते. मात्र, विलंब शुल्कासह आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला या सुविधेचा फायदा मिळत नाही.
प्राप्तिकरातील अनेक सवलती देखील तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे प्राप्तिकर कायदा कलम 10A आणि कलम 10B अंतर्गत मिळणारी सवलत देखील तुम्हाला मिळणार नाही. तर कलम 80IA, 80IAB, 80IC, 80ID आणि 80IE अंतर्गत सवलत देखील मिळणार नाही.
याव्यतिरिक्त विलंब शुल्कासह प्राप्तिकर रिटर्न दाखल केल्यामुळे करदात्याला प्राप्तिकर कायद्याच्या कलम-80IAC, 80IBA, 80JJA, 80JJAA, 80LA, 80P, 80PA, 80QQB आणि 80RRB नुसार मिळणाऱ्या कपातीचा लाभ देखील मिळणार नाही.
तुमचे उत्पन्न प्राप्तिकराच्या अंतर्गत येत नसेल तरी देखील तुम्ही प्राप्तिकर दाखल करायला हवा. तुम्ही प्राप्तिकर दाखल करत असाल तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला होतील. वाचा ITR दाखल करण्याचे फायदे…
कर परतावा दावा दाखल करण्यासाठी:
कर परताव्याचा दावा दाखल करण्यासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा आयटीआर दाखल करतात तेव्हा प्राप्तिकर विभाग त्याची असेसमेंट करतो. अशावेळी कर परतावा थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतो.
अनेक देशातील व्हिसा अधिकारी व्हिसासाठी 3 ते 5 वर्षांच्या आयटीआरची मागणी करतात. या माध्यमातून त्यांच्या देशात जाणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उत्पन्नाचा पुरावा :
ITR दाखल केल्यानंतर एक प्रमाणपत्र मिळते. तुम्ही ज्या संस्थेत नोकरी करतात त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म- 16 भेटतो. या माध्यमातून एक सरकारी कागद तयार होतो, ज्यावरून व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किती आहे, हे निश्चित होते. उत्पन्नाचे नोंदणीकृत प्रमाण पत्र मिळाल्यामुळे क्रेडिट कार्ड तसेच कर्ज मिळण्यास मदत होते.
कर्ज मिळणे सोपे :
ITR उत्पन्नाचे प्रमाण असते. या प्रमाणपत्राला सर्व सरकारी आणि खासगी संस्था उत्पन्नाचे प्रमाण म्हणून स्वीकार करतात. तुम्ही नियमितपणे प्राप्तिकर रिटर्न दाखल करत असाल, तर तुम्हाला कर्ज सहजपणे उपलब्ध होते.
रहिवासी पुरावा म्हणूनही उपयोग:
ITR दाखल केल्यानंतर त्याची पावती तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते. ही पावती रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकता. याव्यतिरिक्त तुमच्या उत्पन्नाचे प्रमाण म्हणून देखील याचा उपयोग होतो.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी :
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तुमची इच्छा असेल तर आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त एखाद्या विभागाकडून तुम्हाला कंत्राट द्यायचे असल्यास आयटीआर दाखवावे लागते. कोणत्याही सरकारी कार्यालयातून कंत्राट घ्यायचे असल्यास मागील 5 वर्षाचे आयटीआर आवश्यक असते.
अधिक विमा संरक्षणासाठी :
तुम्हाला एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण (टर्म प्लान) हवे असल्यास विमा कंपनी आयटीआरची कागदपत्रे मागते. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि त्याची नियमितता पडताळण्यासाठी आयटीआर वर विश्वास ठेवला जातो.