आगामी दोन दिवसात राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । मुंबईसह राज्यातील काही भागात पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, 40 अंशांपार मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मार्च महिन्यातच मे महिन्याहून अधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

अंगाची काहिली मार्च महिन्याच्या मध्यातच होण्याची चिन्हे आहेत. कारण हवामान खात्याने आगामी दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसह, पालघर, रायगड, ठाण्यातही तापमान 42 अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण-कोरड्या वाऱ्यांमुळे पुढील 48 तासांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे. ही अवस्था मार्च महिन्यात असेल, तर एप्रिल आणि मे महिन्याची कल्पनाच न केलेली बरी.

यासंदर्भात हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी एक ट्वीट केले असून त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये मुंबईतील उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईचे कमाल तापमान येत्या 2 दिवसांसाठी 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने सांगितले आहे. पुढे म्हणतात की, कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *