covid vaccine : केंद्राचा मोठा निर्णय ; आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही देणार करोनाची लस,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । करोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने ( covid vaccination ) मोठे पाऊल उचलले आहे. आता देशात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना ( covid vaccination of 12 to 14 year olds ) करोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. येत्या बुधवारपासून म्हणजे १६ मार्चपासून १५ वर्षांखालील मुलांनाही करोनाची लस दिली जाईल. या वर्षी जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवी यांनी यासंदर्भात ट्विट केले. ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाईल. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले. आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस दिला जाईल.

देशात ३ जानेवारी २०२२ पासून देशात प्रथमच १८ वर्षांखालील मुलांना करोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा उघडणे सोपे झाले. आता १२ वर्षांच्या मुलांचेही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. २००८, २००९ किंवा २०१० मध्ये जन्मलेल्या मुलांचे लसीकरण केले जाईल. देशातील १८ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी करोनावरील लस असेल.

भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (DGCI) ने २१ फेब्रुवारीला बायोलॉजिकल-E ची करोनावरील लस ‘कोर्बेवॅक्स’ला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली. DGCI ने १२ वर्षांवरील मुलांसाठी सर्व प्रथम ‘Zycov-D’ या लसीला मंजुरी दिली. भारतीय औषध नियामकाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कडून कोवोव्हॅक्स या करोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. करोनावरील विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारावर DGCI ने कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *