पुणे एसएनडीटी-नळ स्टॉप रस्ता खुला होणार ; पुणेकरांना मिळणार मोठा दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । कोथरूड, चांदणी चौकाकडून डेक्कन जिमखान्याकडे येणाऱ्या सर्व वाहनलाचलकांना घालायला लागणारा वळसा अखेर चार वर्षांनी बंद झाला आहे. एसएनडीटीकडून आठवले चौक, अभिनव चौकामार्गे कर्वे रस्त्याकडे जाण्यासाठी वाहनचालकांचा फेरा सोमवारपासून थांबला असून, त्यांना अवघ्या काही मिनिटांत हा महत्त्वाचा चौक ओलांडता येत आहे.

१५ दिवसांत अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई करू; नारायण राणे यांच्या बंगल्यास नोटीस
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी जानेवारी २०१८ साली एसएनडीटी ते नळ स्टॉप दरम्यानच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोथरूडकडून येऊन नळ स्टॉपकडे जाणाऱ्या वाहनांना कॅनॉल रस्त्याने आठ‌वले चौकातून पुढे नळ स्टॉपला जावे लागत होते. आठवले चौकात पीएमपी बस किंवा खासगी बस वळविताना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता; तसेच वाहनांची वर्दळ वाढल्याने या चौकात वाहनांच्या रांगा लागत होत्या. आता नळ स्टॉप येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असून, उड्डाणपुलासह रस्तादेखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कर्वे रस्त्याने येऊ इच्छिणाऱ्यांना आता रस्ता बदलण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

आठवले चौकातील रांगा कमी

मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर केलेल्या वाहतूक बदलामुळे लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौक आणि कॅनॉल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली होती. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगादेखील लागत होत्या. मात्र, आता कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने कर्वे रस्त्याने येऊन नळ स्टॉप, डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांना आठवले चौक, लॉ कॉलेज रस्तामार्गे जावे लागत नाही. त्यामुळे आठवले चौकात सिग्नलला लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी झाल्या आहेत.

‘त्या’वेळी उडालेला मोठा गोंधळ

मेट्रोच्या कामासाठी एसएनडीटी ते नळ स्टॉपदरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यासाठी सर्वप्रथम जून २०१७ साली प्रयत्न करण्यात आला होता. तत्कालीन वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे यांनी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल केला. मात्र, पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाला होता. वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक बदल लांबणीवर टाकण्यात आला. सहा महिन्यानंतर आवश्यक सुधारणा करून आणि खबरदारी घेऊन वाहतूक बदल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *