महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । उन्हाळ्याच्या सुट्ट्या लवकरच सुरू होतील. पण या सुट्ट्यांच्या तोंडावरच आता विमान प्रवास महागल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्याने विमान प्रवासाच्या खर्चात १५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या भावात तेजी असल्यामुळे विमान कंपन्यांनी देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत विमानांच्या तिकीटामध्ये गेल्या काही आठवड्यात १५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या वाढल्यामुळे परदेशागमन स्वस्त होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. कोरोना काळात देशाबाहेरील विमान उड्डाणांवर निर्बंध असल्याने विमान प्रवास महाग झाला होता.
याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म इक्सिगोने सांगितले की, २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान दिल्ली ते मुंबई एकावेळच्या प्रवासाचे तिकीट प्रति प्रवासी ५,११९ रुपये एवढे होते. पण त्यानंतर आता हे तिकीट २६ टक्क्यांनी महागले आहे. याचप्रमाणे कोलकाता ते दिल्ली दरम्यानच्या तिकिटांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. हा प्रवास तब्बल २९ टक्क्यांनी महागला आहे.