महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून कोरोना आता काढता पाय घेण्याच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून घटलेली रुग्णसंख्या आता शून्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सातारा आणि कोल्हापूर जिह्यांत आज एकही रुग्ण आढळला नाही. तर, सांगली आणि सोलापूर जिह्यांमध्ये प्रत्येकी केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे. केवळ नगर जिह्यातच आज दुहेरी संख्या म्हणजेच 12 रुग्ण आढळले आहेत. जिह्यातील ही दोन वर्षांतील नीचांकी रुग्णसंख्या आहे.
सातारा जिल्हावासीयांसाठी आजचा दिवस सर्वाधिक आनंददायक ठरला. कारण तब्बल दोन वर्षांनी जिह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर आला आहे. 369 चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह नसल्याने पॉझिटिव्हिटी दरही शून्यच आहे. त्याचप्रमाणे गेल्या सहा दिवसांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या दोन लाख 80 हजार 196 असून, मृतांचा आकडाही 6681वर स्थिर आहे. आज दिवसभरात सातजण कोरोनामुक्त झाले असून, एकूण कोरोनामुक्तांची संख्या दोन लाख 71 हजार 717 इतकी आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या केवळ 49 आहे.
कोल्हापूर जिल्हावासीयांनाही आज मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या 24 तासांत जिह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या दोन लाख 20 हजार 311वर स्थिर राहिली आहे. मृतांची संख्याही 5911वर स्थिर आहे. नऊ रुग्ण बरे झाले असून, आजवर दोन लाख 14 हजार 383 रुग्ण बरे झाले आहेत. 17 रुग्ण ऑक्टिव्ह आहेत. यांपैकी एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे.
सोलापूर जिह्यात आज एक रुग्ण आढळला असून, रुग्णसंख्या दोन लाख 19 हजार 689वर पोहोचली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 5231वर गेली आहे. नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आजवर दोन लाख 14 हजार 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मनपाहद्दीत चार दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नसून, आज एक रुग्ण बरा झाला आहे. केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला असून, आठ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 23 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.
सांगली जिह्यात आज केवळ एका रुग्णाची नोंद झाली असून, दोन रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांची संख्या दोन लाख 13 हजार 873वर पोहोचली आहे. आजवर दोन लाख आठ हजार 350 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या केवळ 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सलग चौथ्या दिवशी एकाचाही मृत्यू झाला नसून, मृतांची संख्या 5509वर स्थिर आहे. महापालिका क्षेत्रात आज एकही रुग्ण आढळलेला नाही.