Russia vs Ukraine War: आता पुतीन यांची ‘रेड लिपस्टिक आर्मी’ मैदानात?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ मार्च । रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. युद्धामुळे युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या शहरांचं मोठं नुकसान झालं आहे. काही शहरं तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या मारियुपोलमधील एक प्रसुती रुग्णालय उद्ध्वस्त झालं. रशियानं रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचे फोटो काळीज हेलावून टाकणारे आहेत.द टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयातील हल्ल्याबद्दल रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या माहिती आणि माध्यम विभागाच्या संचालिका मारिया जखारोवा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्या संतापल्या. हा माहिती दहशतवाद असल्याचं त्या म्हणाल्या. युक्रेनचा दावा खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याआधी मारिया जखारोवा यांनी युक्रेनकडून जैविक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा केला होता. मीडिया सॅव्ही असलेल्या मारिया यांना पुतीन सरकारनं खोटी माहिती पसरवण्याचं काम दिलं आहे. ब्रिटिश माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे.एका बाजूला रशियन पुरुष युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढत असताना दुसऱ्या बाजूला प्रोपोगेंडा युद्धात पुतीन यांच्याशी संबंधित महिलांनी आघाडी सांभाळली आहे. रेड लिपस्टिक आर्मीच्या माध्यमातून पुतीन वेगळाच मानसिक खेळ करत असल्याचं टेलिग्राफनं म्हटलं आहे.

सरकारी निर्णयांची माहिती देण्यासाठी, पत्रकार परिषदेत बऱ्याचदा पुरुषांचा वावर असतो. मात्र त्यांच्या जागी पुतीन यांनी सुंदर आणि ग्लॅमरस महिलांना संधी दिली आहे. डार्क लिपस्टिक, स्टायलिश राहणीमान ही या महिलांची वैशिष्ट्यं. जखारोवा या त्यापैकीच एक. पुतीन यांच्या रेड लिपस्टिक आर्मीतील महत्त्वाच्या शिलेदार. त्यांच्या पत्रकार परिषदेला यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात.मारिया जखारोवा आणि RT ब्रॉडकास्टरच्या मुख्य संपादिका मार्गरिटा सिमोनियन यांच्यावर युरोपियन महासंघानं निर्बंध लादले आहेत. याच यादीत मारिया बुटिना यांच्या नावाचाही समावेश आहे. मारिया २०१८ मध्ये अमेरिकेविरोधात हेरगिरी करताना पकडल्या गेल्या. त्या आता पुतीन यांच्या पक्षाच्या सभासद आहेत. युक्रेनमधील नागरिक स्वत:वर गोळ्या झाडून घेत असल्याचं विधान त्यांनी एका मुलाखतीत केलं होतं.

रशियाच्या माजी हेर ऍना चॅपमॅन यादेखील युद्धाचं समर्थन करताना दिसतात. रशियाच्या खासदार आणि सरकारच्या प्रवक्त्या वेलेंटिना मतवियेंको यांनीही युद्ध करण्याच्या निर्णयाची पाठराखण केली. भावांमध्ये होत असलेल्या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी रशियानं केलेला हल्ला हाच एक पर्याय असल्याचं वेलेंटिना म्हणाल्या.आपला संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांची मदत घेणारे पुतीन हे काही पहिले आणि एकमेव राष्ट्रप्रमुख नाहीत. २०१७ ते २०२० या कालावधीत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांच्या राजकीय सल्लागार म्हणून केलीनेन कॉनवे यांनी काम पाहिलं.निवृत्ती घेईपर्यंत उत्तर कोरियात रि चुन ही यांनी हीच कामगिरी सांभाळली. त्या वृत्त निवेदिका होत्या. आपल्या चमकदाक पोशाखामुळे त्या पिंक लेडी म्हणून ओळखल्या जायच्या. आण्विक घडामोडी आणि सत्ताधारी पक्षाचं गुणगान गाण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *