महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ मार्च । देशातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली असून बहुतांश राज्यांनी कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात जाणवली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातले होते. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण, पंजाब सरकारने राज्यातील कोरोनाचे सर्वच निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत.
All existing #COVID19 restrictions imposed in the state of Punjab, removed with immediate effect. pic.twitter.com/hj8bO4sTI4
— ANI (@ANI) March 15, 2022
पंजाब सरकारच्या गृह खात्याने परिपत्रक जारी केलं असून कोरोनामुळे राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे निर्देश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत. गृह खात्याने यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि सर्वच झोनल आयजीपींना पत्र लिहून तात्काळ यासंदर्भात कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. महामारीच्या अनुषंगाने कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन 2005 अन्वये लादण्यात आलेले सर्वच निर्बंध तात्काळ क्षणी शिथिल करण्यात यावेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, नागरिकांनी कोविड नियमावलींचे पालन करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नुकतेच पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली असून लवकरच येथे आदमी पक्षाचे सरकार स्थापन होत आहे. भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे पंजाबमधील पहिले मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेणार आहेत. मान यांनी सोमवारी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते संगरूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण, आता ते 16 मार्चला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.