महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । विमान प्रवाशांना विमान सेवेचा लाभ घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत अनेक वर्षांनंतर उच्चांकीवर पोहोचल्या असून बुधवारी विमान इंधनाच्या किमतीतही १८ टक्के दरवाढ झाली आहे. ही विमानाची इंधनदरवाढ आतापर्यंतची उच्चांकी आहे.
या वर्षातील ही सहावी दरवाढ असून आजच्या दरवाढीमुळे विमानाचे इंधनाचे दर पहिल्यांदाच सरासरी एक लाख रुपये प्रति किलोलिटरवर पोचले आहेत.रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. त्यामुळे वाहनांना लागणाऱ्या इंधनासह विमानासाठी लागणारे इंधनाचे दरही वाढले आहेत. दिल्लीत इंधनाचा दर एक लाख १० हजार ६६६ रुपये प्रति किलोलिटरवर पोचला आहे. आंतरराष्ट्रीय किंमतीच्या आधारे महिन्याच्या पहिल्या किंवा १६ तारखेला विमान इंधनाच्या किंमतीत बदल होतात. रशियाने युक्रेनवर हल्ले केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर मागील आठवड्यात १४० डॉलर प्रति पिंप झाले होते, जे मागील १४ वर्षांतील उच्चांकी दर्शवत होते. आता ही किंमत १०० डॉलर प्रति पिंप झाली आहे. बुधवारी ब्रेंट क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति पिंप होते.
४० टक्के खर्च इंधनावर
विमान सेवा देणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण खर्चातील ४० टक्के खर्च इंधनावर करत असतात. या वर्षी हा खर्च अधिक वाढणार आहे. २००८ मध्ये विमान इंधनाचे दर ७१ हजार २८ रुपये प्रति किलोलिटरवर गेले होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर १४७ डॉलर प्रति पिंप झाले होते.
कच्च्या तेलाचे दर ६ टक्क्यांनी घसरले
रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती सार्वकालिक उच्चांकीवर पोहोचल्या होत्या, परंतु आता या किमतीने जगाला थोडा दिलासा दिला आहे. कच्च्या तेलाचे दर मंगळवारी सहा टक्क्यांनी कमी होऊन १०० डॉलर प्रति पिंप झाले आहेत. हे दर मागील तीन आठवड्यांनंतर घटले आहेत. आता जागतिक स्तरावर चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली असून लॉकडाउनमुळे इंधनाची मागणी घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीनंतर मंगळवारी पहिल्यांदाच ब्रेंट आणि यूएस क्रूड फ्यूचर्स बेंचमार्क १०० डॉलर प्रति पिंपावर आले आहेत. ७ मार्चला कच्च्या तेलाचे दर १४ वर्षांनंतर उच्चांकीवर पोहोचले होते. ब्रेंट फ्यूचर्स ६.९९ डॉलरने स्वस्त होऊन ९९.९१ डॉलर प्रति पिंप झाले आहे; तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ६.५७ डॉलरने स्वस्त होऊन ९६.४४ डॉलर प्रति बॅरल झाले आहे.