चीनमध्ये कोरोनाचा कहर; भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ मार्च । कोरोना विषाणू ज्या चीनमधून जगभरात पसरला, त्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने हाहाकार माजवला आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन परिस्थिती सामान्य होत असताना चीनमधील ही भयानक परिस्थिती धडकी भरवणारी आहे. चीनमध्ये अचानक कोरोनाबाधितांच्या विस्फोट झाला असून रुग्णालये कमी पडू लागली आहेत. भारतदेखील नुकताच तिसऱ्या लाटेतून सावरला आहे. ज्या ओमिक्रॉनने जगभरातील अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या वाढवली होती, त्याचा प्रभाव भारतात पण तितकासा दिसून आला नाही. परंतु जगातील काही देशांमधील वाढती बाधितांची संख्या पाहून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे.

सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तीन बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये बाधितांची संख्या वाढण्याबाबत सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि जास्तीत जास्त जीनोम सिक्वेंसिंग यांचा समावेश आहे. या बैठकीला देशातील प्रमुख डॉक्टर, आरोग्य सचिव, जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) सचिव, NCDC प्रमुख आणि भारताचे औषध नियंत्रक जनरल उपस्थित होते.

चीनमध्ये बुधवारी कोरोनाचे ३ हजार २९० बाधित आढळून आले. यापूर्वी मंगळवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक कोरोनाबाधित चीनमध्ये आढळून आले होते. हा नवीन विषाणू अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये झिरो कोरोना धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न असल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कमी बाधित संख्या वाटत असली, तरी हजारच्यावर बाधित आढळल्यास येथील यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये चीनमध्ये अनेक शहरांमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *