महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । पोलीस खाते, सैन्य दल किंवा अर्धसैन्य दलात नोकरी करताना जीव मुठीत धरुन, जीवावर उदार होऊनच अनेकदा कर्तव्य बजावावे लागते. त्यातच, केंद्रीय राखीव दलातील कर्मचाऱ्यांनाही दंगल, जाळपोळ, नक्षलग्रस्त भाग किंवा कधी कधी सीमारेषेवरही कर्तव्य बजावावे लागते. यावेळी, अनेकदा शत्रूशी दोनहात करताना वीरमरणही प्राप्त होते. त्यानंतर, जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येतो. या मदतनिधीत आता वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानांना कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या निधीत 20 लाखांहून वाढवत 30 लाख असा सानुग्रह निधी देण्यात येणार आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंह यांनी गुरूवारी यासंदर्भातील घोषणा केली. कर्तव्यावर असताना शहीदगती प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली असून यापुढे हा निधी 30 लाख रुपये केल्याचे कुलदीपसिंह यांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच, केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षेसंदर्भात बोलताना कुलदीपसिंह म्हणाले की, आर्टीकल 370 हटविल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटना बहुतांश शुन्यावर येऊन पोहचल्या आहेत. तर, विदेशी दहशतवादी आणि घुसकोरीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, सीआरपीएफने 41 व्हीआयपींना सुरक्षा पुरवली होती. निवडणुकीनंतर 27 सुरक्षाप्राप्त लोकांकडून ही सुरक्षा काढून घेण्यात आल्याचेही कुलदीपसिंह यांनी सांगितले.