महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई; राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह करत जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी देशातील जनतेला गर्दी करु नका, सुचनांचे पालन करण्याचे असे आवाहन केले. वेळ पडल्यास सैन्य बोलवावे लागेल आणि हा शेवटचा पर्याय असेल, असा इशाराही त्यांनी दिला.फेसबुक लाईव्हदरम्यान एका व्यक्तीने सैन्याला बोलावण्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, एकीकडे देश चिंतेत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार आवाहन करत आहेत. 90 टक्के लोक सूचनांचे पालन करत आहेत, पण 10 टक्के लोक अजूनही हे नियम पायदळी तुडवत आहेत. सैन्य बोलावणे हा शेवटचा पर्याय आहे. परकियांविरोधात लष्कराला बोलावले जाते, स्वकियांविरोधात नाही. आवश्यकता वाटली तर याबाबत निश्चितच विचार केला जाईल, असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 14 एप्रिल हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा आपण जवळपास महिना-दीड महिना साजरा करत असतो. सध्याच्या घडीला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यावेळी हा कार्यक्रम पुढे नेणं शक्य आहे का याचा विचार निश्चितपणे करण्याची गरज आहे. आपण सामूहिकरित्या एकत्र आलो तर नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग ओढावेल याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचं स्मरण आपण करुया, त्यांच्या योगदानाची आठवण ठेवूया. परंतु त्याच्या कालावधीत बदल करणं शक्य आहे का याचा विचार जाणकारांनी करावा.
यासोबतच शरद पवार यांनी देशातील तरुणाईला एक महत्त्वाचा सल्ला दिला. सध्या शरद पवार देखील घरात वाचन करत असल्याचे तसेच गीत रामायण ऐकत असल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्याप्रमाणेच शरद पवार यांनी देशातील तरुणाईला वाचन करण्याचे व ज्ञान वाढवण्याचे आवाहन केले. व्यक्तिगत ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी काळजी घ्या. सतत वाचत राहा, सुसंवाद ठेवा आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी यावेळी शिवराय, आंबेडकर तसेच फुले दाम्पत्य यांचे साहित्य तरुणांने वाचवे असे सुचवले.
नर्स, डॉक्टर तसेच पोलिसांच्या कामचे कौतुक शरद पवार यांच्याकडून करण्यात आले. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे सांगितले.