महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेत साखर कारखान्यांनी साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याकडे लक्ष द्यायला हवे. इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, बायोडिझेल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक हेच भविष्यातील इंधन आहे. त्यामुळे आता इंधन आयात करणारा भारत इंधन निर्यात करणारा देश बनवायचा आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी म्हणाले.
साखर आणि इथेनॉल परिषदेत ते म्हणाले की, केवळ साखर उत्पादनाकडे लक्ष दिले तर भविष्यात हा उद्योग संकटात जाईल. जागतिक करारांमुळे २०२३ पासून साखरेला अनुदानही देता येणार नाही. सध्या देशात साखर, ऊस, गहू, तांदूळ, मका अशा पिकांचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त आहे. तर, तेलबियांचा तुटवडा. वर्षाकाठी १ लाख ४० कोटींचे तेल आपण आयात करतो. वैश्विक स्थितीचा अभ्यास करून शेती उत्पादन घेण्याची मानसिकता वाढवण्यासाठीसाखर उद्योगाने पुढाकार घ्यायला हवा. शेतकरी फक्त अन्नदाता राहिला तर त्याची गरिबी कधीच दूर होणार नाही. त्यालाही इंधनदाता बनवावे लागेल. साखरेचे उत्पादन कमी करणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढविणे हे भविष्यासाठी चांगले आहे, असेही गडकरी म्हणाले .
आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उपायांचा अवलंब करण्याची गरज असल्याने इथेनॉल आणि हरित इंधनाचा वापर केला पाहिजे. देशातील वाहन निर्मात्यांनी मिश्र इंधनावर आधारीत वाहनांच्या निर्मिती सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. सरकार त्याला प्रोत्साहन देत असल्याचे गडकरी म्हणाले.
लोकसंख्या आणि वाहने
देशातील डिझेलवरील चार लाख टेलिकॉम टॉवर इथेनॉलवर आणले जाणार आहे. इथेनॉलच्या मागणीची शंका बाळगू नका. वाहनसंख्या आणि लोकसंख्या वाढीत नेहमी आघाडीवर राहण्याचा भारतीयांचा विक्रम आहे, अशी टिप्पणी गडकरी यांनी केली.