Nitin Gadkari: मुंबई-श्रीनगर २० तासांत ? अमेरिकेसारखे रस्ते करणार !; गडकरींच्या मोठ्या घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संसदेत देशातील रस्त्यांबाबतचा ‘रोडमॅप’ सादर केला. २०२४ च्या आधी भारतातील रस्ते अमेरिकेसारखे बनतील, अशी मोठी घोषणाच यावेळी गडकरी यांनी केली. श्रीनगर ते मुंबई हे अंतर रस्तेमार्गे अवघ्या २० तासांत कापता येईल, असा दावाही यावेळी गडकरी यांनी केला. ( Nitin Gadkari Latest Breaking News )

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या एका विधानाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी देशवासीयांना अमेरिकेप्रमाणे रस्ते देण्याचे आश्वासन दिले. ‘अमेरिका श्रीमंत देश आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत असे नाही. अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’, असे जॉन केनेडी म्हणायचे. केनेडी यांचे हे वाक्य मी नेहमी ध्यानात ठेवतो, असे सांगत गडकरी यांनी २०२४ वर्ष समाप्त होण्याआधी भारतातील रस्तेही अमेरिकेच्या तोडीचे होतील, असा विश्वास दिला.

गडकरी यांनी यावेळी रस्तेविकासाचा रोडमॅपच सादर केला. दिल्लीतून जवळच्या राज्यांतील अनेक शहरं केवळ दोन तासांत गाठता येतील. येत्या डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्णत्वास येतील. दिल्ली-अमृतसर अंतर ४ तासांत कापता येईल. दिल्ली-मुंबई हे अंतर १२ तासांत कापता येणार असून हे कामही येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे, असे गडकरी म्हणाले. दक्षिणेत चेन्नई-बेंगळुरू हा मार्ग होत असून नव्याने निर्माण होत असलेल्या रस्त्यांची ही यादी मोठी असल्याचे गडकरी म्हणाले.

फारूख अब्दुल्ला यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील कामांची जंत्रीच सादर केली. जम्मू काश्मीरमध्ये ६० हजार कोटींची कामे सुरू आहेत. जोजिला टनेलचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. तिथे उणे तापमानात सुमारे एक हजार कामगार काम करत आहेत. २०२६ च्या ऐवजी २०२४ च्याआधी या टनेलचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. मनालीत अटल टनेल बनल्याने तीन तासांचं अंतर आता आठ मिनिटांत कापता येत आहे. लडाख लेहहून थेट कारगिल, कारगिल ते झेरमोर, झेरमोर ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू महामार्ग बनत आहे. यात एकूण पाच टनेलचे काम सध्या सुरू आहे, असे गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *