हवाई सफर महागणार ; दिल्ली-मुंबईसह सर्व व्यस्त मार्गांवर विमान प्रवास महागला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । जेट विमानांच्या इंधनाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाल्याने व्यस्त मार्गावर विमान प्रवास महागला आहे. येत्या उन्हाळी हंगामासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची मागणी वाढू लागली असताना ही भाडेवाढ झाल्यानं आता नागरिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विमान इंधनाच्या (एटीएफ) किमती वाढल्याचा परिणाम दिसू लागला आहे. ऑइल हिटचा प्रभाव कमी करण्यासाठी विमान कंपन्यांनी प्रवासी भाडे वाढवल्याचं कारण पुढे येत आहे. विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे काही मार्गांवर विमान भाडे जवळपास दुप्पट झाले आहे.

दिल्ली-मुंबई, हैदराबाद-दिल्ली आणि चेन्नई-दिल्ली या व्यस्त मार्गांवरील सरासरी भाडे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढले आहे. 21 ते 31 मार्च दरम्यान भारतातील सर्वात व्यस्त मार्ग, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणार्‍या प्रवाशांना एकेरी तिकीट भाडे सुमारे 7,956 रुपये द्यावे लागतील. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Ixigo वरील डेटा दर्शवितो की हे भाडे एका वर्षापूर्वीच्या भाड्यापेक्षा जवळपास 60% जास्त आहे.

मागणीवर परिणाम नाही

याच कालावधीसाठी हैदराबाद-दिल्ली, चेन्नई-दिल्ली आणि मुंबई-बेंगळुरू मार्गावरील फ्लाइट्ससाठी एकतर्फी तिकिटांची किंमत अनुक्रमे 8,253 रुपये, 9,767 रुपये आणि 6,469 रुपये आहे. हा दर एका वर्षापूर्वीच्या भाड्यापेक्षा अनुक्रमे 60%, 64% आणि 44% अधिक आहे. कोलकाता-दिल्लीच्या भाड्यात 43 टक्के आणि दिल्ली-बेंगळुरूच्या भाड्यात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हवाई इंधन दरात सहाव्यांदा वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या (ATF) किमती वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात हवाई इंधनाच्या किमतीत ऐतिहासिक उडी मारली गेली आणि पेट्रोलियम कंपन्यांनी एटीएफच्या किमती 17,135.63 रुपये प्रति किलोलीटरने वाढवल्या. दिल्लीत ATF 18.3 टक्क्यांनी महाग झाला आहे आणि नवीन किंमत 1,10,666 रुपये प्रति किलोलीटर आहे. कोलकाता येथे जेट इंधनाची किंमत 1,14,979 रुपये प्रति किलोलिटर आहे. चेन्नईमध्ये 1,14,133 रुपये, दिल्लीमध्ये 1,10,666 रुपये आणि मुंबईत 109,119 रुपये प्रति किलोलीटर आहे. यावर्षी सहाव्यांदा एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *