महागाईचा भडका ; पेट्रोल, डिझेल ची १२५ कडे वाटचाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तब्बल १३७ दिवस स्थिर राहिलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मंगळवारी प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाली. तर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे महागाई वाढणार असल्याने केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. दरम्यान, इंधनाच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत ३ लाख कोटींची भर पडली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर ४ नोव्हेंबरपासून स्थिर होते. तर जुलै ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकी स्तरावर पोहोचल्या असतानाही निवडणुकीमुळे एलपीजी आणि पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या.

चालू आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-डिसेंबर) पहिल्या नऊ महिन्यांत (२०२१-२२) मध्ये पेट्रोलियम उत्पादनांवरील सीमा शुल्क आणि अबकारी कराच्या रूपात केंद्र सरकारचा अप्रत्यक्ष कर महसूल जवळपास २४ टक्क्यांनी वाढून ३,३१,६२१.०७ कोटी रुपये झाला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीमुळे ही बाब समोर आली आहे.

आणखी २० रुपयांनी महागणार?
युद्धामुळे सध्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होत असून, ते सध्या ११६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. निवडणुकांमुळे १३७ दिवस दरवाढ न केल्याने तेल कंपन्यांना १५ ते २० रुपयांचा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेल दर २० रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *