महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । रंगपंचमी सणानिमित्त साईबाबांच्या मूर्तीला आकर्षक वस्त्र्ा आणि अलंकार परिधान करण्यात आले असून, साईमूर्तीवर रंगांची उधळण करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिर्डीत रंगपंचमी उत्सव साजरा केला नाही. यंदा मात्र परंपरेनुसार रंगपचंमी उत्सव भाविकांसह मोठय़ा जल्लोषात साजरा करण्यात आला.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात द्वारकामाई मंदिरातून साईबाबांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिर्डीकरांसह हजारो साईभक्त सहभागी झाले होते. ही मिरवणूक रंगपंचमीचे मुख्य आकर्षण ठरली. तर, यावेळी एकमेकांना रंगाने चिंब भिजवीत ढोल-ताशांच्या तालावर साईभक्तांनी ठेका धरला.
याप्रसंगी साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ऍड. अविनाश दंडवते, सुहास आहेर, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, रवींद्र गोंदकर, संजय अप्पा शिंदे, ताराचंद कोते, सचिन कोते, गजानन शेर्वेकर, सर्जेराव कोते, आदींसह शिर्डी ग्रामस्थ व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जेजुरी गडावर रंगपंचमी साजरी
साऱया महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबा गडावर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी पिवळ्याधमक हळदीच्या सोनेरी रंगात असणारे खंडोबा व म्हाळसादेवी आज मात्र रंगपंचमी निमित्त विविध आकर्षक रंगात न्हाहून निघाले.
पहाटे खंडोबाची भुपाळी, आरती, पूजा करण्यासाठी पुजारी, नित्य सेवेकरी, ग्रामस्थ गडावर आले. त्यांनी विविध रंगांनी मंदिराचा सारा गाभारा सजविला. देवांना स्नान झाल्यावर उपस्थित भक्तांनी रंगीबिरंगी नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण केली. मार्तंड भैरवाच्या मूर्तीला लाल, केशरी, निळा आदी रंग लावल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. दररोज ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत पिवळ्याधमक भंडाऱयाची उधळण होते. आज मात्र देवाचा जयघोष करीत भाविक विविध रंग खेळताना दिसले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे मंदिर बंद होते. त्यामुळे गडावर कोणालाही जाता येत नव्हते, सण उत्सवावर बंदी होती. आज मात्र मुक्तपणाने भाविकांनी विविध रंगांची उधळण करून रंगपंचमीचा सण उत्साहाने साजरा केला.