महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ मार्च । संपूर्ण जगाची धाकधूक वाढवणाऱ्या कोरोना (Covid-19) व्हायरसचा देशात प्रादुर्भाव सध्या घटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. 31 मार्चपासून देशातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे. पण, मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं मात्र अनिवार्य असणार आहे.
सध्या देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 778 नवीन रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 1 हजार 581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 33 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 605 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 73 हजार 57 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.