महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । चीन आणि दक्षिण कोरियासह १५ देशांमध्ये पुन्हा अवतरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने भारतातही शिरकाव केल्याचे समजते. कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि नवी दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाने बाधित झालेल्यांमध्ये नवी लक्षणे आढळून आली आहेत.
डेल्टाक्रॉन सर्वप्रथम फ्रान्समधील पॅश्चर इन्स्टिट्यूटमध्ये डेल्टाक्रॉन सर्वप्रथम आढळला. तत्पूर्वी वर्षाच्या सुुरुवातीला हा व्हेरिएंट फ्रान्ससह, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आढळला होता. इस्रायलमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले. आरटीपीसीआरमधून तो निदर्शनास आला. अजून तरी याचे फार गंभीर रुग्ण आढळलेले नाही. मात्र, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला गांभीर्याने घ्या, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.
काय आहे नवा अवतार?
कोरोनाच्या नव्या अवतारात डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचे मिश्रण असल्याचे बोलले जाते. याचे नाव डेल्टक्रॉन असे आहे.
डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्ही व्हेरिएंट्सच्या जनुकीय रचनांची सरमिसळ होऊन नवा व्हेरिएंट तयार झाला आहे.
डेल्टामुळे अनेकांचे जीव गेले तर ओमायक्रॉन हा झपाट्याने संक्रमित होत असल्याचे आढळून आले होते.
लक्षणे काय?
विशेष अशी लक्षणे अद्याप तरी आढळून आलेली नाहीत.
एरवी कोरोनाची जी सामान्य लक्षणे आढळतात तीच यातही आहेत.
त्यातल्या त्यात वास आणि चव यांच्या जाणिवा काही काळापुरता नष्ट होणे हे प्रमुख लक्षण समजले जाते.
तसेच घशाला सूज याही लक्षणाचा समावेश आहे.
कोणाला अशी लक्षणे वाटत असल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.