राज्यात उष्णतेची लाट, लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । मार्च महिना संपण्यापूर्वीच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. याचा पपईसह अनेक फळबागांना फटका बसू लागला आहे. वाढत्या तापमानाचा फटका थेट शेतक-यांना बसू लागलाय. धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांमधल्या फळबागा करपू लागल्यात. उष्णतेमुळे पपईचं सर्वाधिक नुकसान होतंय. तापमानामुळे फळं वेळेआधीच पिवळी पडत असल्यानं बागा उद्ध्वस्त होतायत. (north maharashtra beed and nandurbar fruits farmer big blow due to climate changes)

नंदुरबारमध्ये 5 हजार हेक्टरवर पपईची लागवड केली जाते. हंगाम आता कुठे सुरू होतोय. त्यात वाढत्या उष्णतेनं टेन्शन वाढवलंय. दुसरीकडे पपईवर विषाणूजन्य रोगांमुळे पानगळ होतेय. त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय.

हंगामाच्या सुरूवातीला पपईच्या दराचा मुद्दा गाजला. त्यातून मार्ग निघतो न निघतो तोच बहारावर आलेल्या फळ बागा हातच्या जाण्याची भीतीनं बळीराजाला घाम फोडलाय. पपईप्रमाणेच डाळिंब, पेरू, आंब्यालाही वाढत्या उन्हाचा फटका बसतोय. नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे.

फळबागांची कशी काळजी घ्याल?

उन्हापासून बागा वाचवण्यासाठी झाडाच्या बुंध्याला मल्चिंग पेपर किंवा पालापाचोळ्याचं आच्छादन करावं. पपईच्या फळांना गोणपाटाचं आवरण घाला. फळबागांना पाणी देण्याचा कालावधी कमी करावा. पेरू, डाळिंब या फळांच्या आवरणासाठी विशेष बॅग्स मिळतात. त्यांनी फळं झाकून घ्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *