वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं या जिल्ह्याला झोडपलं ; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । मागील काही दिवसांपासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा चटका वाढल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री सांगली (Sangli) शहरासह वाळवा, पलूस, तासगाव, विटा आणि कवठेमहांकाळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं (Rainfall with gusty wind) झोडपले. रात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, शाळू, कलिंगड, आंबा आणि द्राक्षे या पिकांना मोठा फटका बसला आहे.

सध्या रब्बी हंगाम काढणीला आला आहे. असं असताना राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे गहू आणि शाळू उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्षे पिकाचं मोठं नुकसान होत असून बेदाणा काळा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठंमोठी झाडे उन्मळून पडली होती.

रस्ते बंद झाल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक खोळंबली होती. तसेच अनेक ठिकाणी वीजप्रवाह देखील खंडीत करण्यात आला होता. सध्या द्राक्षे हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र अवकाळीच्या पावसाने द्राक्षबागायतदार शेतकरी धास्तवला आहे. हाता-तोंडाला आलेला घास हिरावण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याशिवाय सततच्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा शेडवर टाकण्यात आलेली द्राक्षे आणि बेदाणा देखील काळा पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच दक्षिण कोकणासह लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *