बुकिंगला तुफान प्रतिसाद ; दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय विमाने पुन्हा झेपावणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । करोना संकटातून सावरल्यानंतर आज रविवार २७ मार्च पासून देशातून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पूर्ववत झाली आहे. सरकारने विमान कंपन्यांवर घातलेले मर्यादित आसन क्षमतेचे निर्बंध हटवले आहेत. आता पूर्ण आसन क्षमतेने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार असल्याचे सरकारने म्हटलं आहे. विमान सेवा सुरळीत झाल्याने परदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतीय विमान कंपन्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी देखील भारतातील सेवा पूर्ववत केली आहे. यात एमिरेट्स, व्हर्जिन अटलांटिक आणि एलओटी पोलिश या कंपन्यांनी त्यांचे भारतातील सेवांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विमान सेवा सुरु करण्याची घोषणा झाल्यानंतर या सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे विमान तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश कंपन्यांच्या तिकिट बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई आणि नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तिकिट बुकिंग वाढली आहे. नजीकच्या काळात दक्षिण आशिया आणि युरोपातील विमान प्रवासासाठी मोठी मागणी असेल, असे विमानतळ प्रवक्त्याने सांगितले. सुट्यांचा हंगाम लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे प्रमाण १६५ टक्क्यावरून ३०० टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

करोनाच्या पहिल्या लाटेत खरबदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा खंडीत कारण्याचा निर्णय घेतला होती. जवळपास दोन वर्ष विमान सेवा पूर्णपणे ठप्प होती. तर काही देशांबरोबर द्विपक्षीय करारानुसार आणि बायो बाबल नियमावलीच्या आधारे विशेष विमान सेवा सुरु ठेवण्यात आली होती.

केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय विमान सेवेला हिरवा कंदिल दाखवला होता. नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाने अटी आणि शर्थीच्या आधारे आंतराष्ट्रीय विमान सेवेला परवानगी दिली होती. मात्र युरोपात करोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटने नवं संकट उभं केले. ज्यामुळे अवघ्या काही दिवसात हा निर्णय रद्द करावा लागला. सरकारने १५ डिसेंबर २०२१ पासून पुन्हा आंतराष्ट्रीय विमान सेवा खंडीत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *