Ola Scooter Fire in Pune: आता हाच भुर्दंड बाकी होता ! ओलाची एस १ प्रो पुण्यात भररस्त्यात जळाली ; Video व्हायरल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । पेट्रोल, डिझेलच्या चढ्या किंमतीत देशातील वातावरण तापलेले असताना ओलाने गरम तव्यावर भाकरी भाजून घेतली होती. अर्धवट तयारी करत भारतीयांना इलेक्ट्रीक स्कूटरचे स्वप्न दाखविले होते. भारतीय देखील खिशाला आग लागल्याने या स्कूटरवर तुटून पडले होते.

हे कमी की काय म्हणून आज एक भयावह व्हिडीओ आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सव्वा ते दीड लाखाची ही ओला एस १ प्रो इलेक्ट्रीक स्कूटर भररस्त्यात पेटली आहे. यामुळे ओलाच्या स्कूटर किती सुरक्षित आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर कामालीचा शेअर होऊ लागला आहे. यामध्ये ओलाच्या स्कूटरला आग लागली आहे आणि जळाली आहे. आगीच्या ज्वाळा दिसत असताना अचानक स्फोट झाल्याचा आवाज या व्हिडीओतून ऐकायला येत आहे.

१५ सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. ओला एस१ प्रो रस्त्याच्या शेजारी उभी केलेली दिसत आहे. माहितीनुसार ही स्कूटर पुण्यातील आहे. या व्हिडीओनंतर ओलाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्कूटरच्या मालकाशी संपर्क झाला आहे, तो सुरक्षित आहे. पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याचे समोर आले आहे. या आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल, यानंतर ही माहिती सार्वजनिक केली जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

वाहनाची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, स्कूटरमध्ये चांगल्या दर्जाची उत्पादने वापरली जातात. आम्ही ही घटना गांभीर्याने घेतली असून योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे, असे ओलाने म्हटले आहे. लिथियम-आयन बॅटरीचे नुकसान किंवा शॉर्ट सर्किटमुळे असे घडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *