![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने आता मिळालेल्या बहुमताचा फायदा घेत वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये आप सरकारने माजी आमदारांना एक टर्म पेन्शन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये घरोघरी रेशन पोहोचवण्यासाठी सरकारकडून ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ सुरू केली जाणार आहे. फोन करून योग्य वेळेत लोकांच्या घरी रेशन पोहोचवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सांगितले की, पंजाबमध्ये रेशनचे घरोघरी वितरण सुरू होईल. ज्याद्वारे सरकार लोकांच्या घरोघरी रेशन पोहोचवणार आहे. हे काम अधिकारीच करतील. आम आदमी पक्षाने दिल्लीतही ही योजना सुरू केली. मात्र केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली होती.
पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने दरमहा 300 युनिट मोफत करण्याची घोषणा केली होती. सरकार स्थापन झाल्यास 1 एप्रिलपासून पंजाबमधील प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे आश्वासनही भगवंत मान यांनी दिले होते. भगवंत मान यांच्या सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. भगवंत मान यांनी राज्यातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.