महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करून वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज (सोमवार ) येथे केले. वीज कर्मचाऱ्यांच्या ३९ संघटनांनी खासगीकरणाविरोधात आजपासून संप पुकारला आहे. यावर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणाले की, राज्यात सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे संप करून वीज कर्मचाऱ्यांनी राज्यातील जनतेला वेठीस धरू नये. वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी संघटनांना चर्चेसाठी बोलवले आहे. या बैठकीत सकारात्मक मार्ग काढला जाईल. सध्या महावितरण आर्थिक संकटात आहे. संप सुरू राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातीव वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार एक पाऊल मागे येण्यास तयार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनीही एक पाऊल मागे यावे, असे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले.
तसेच वीज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण आर्थिक संकटात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बीले वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.