मलिक आता बिनखात्याचे ‘नवाब’:राजेश टोपे, जितेंद्र आव्हाडांकडे नवाब मलिकांची खाती, राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर ठाकरे सरकारचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला. यानुसार नवाब मलिक यांच्याकडे असलेली दोन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर दोन मंत्र्यांकडे देण्यात आली. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. ​​​​​​

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस केली. यानुसार राज्यपालांनी मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवली आहे.

याशिवाय मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला. दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी इतरांना देण्यात आली. त्यात कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक करण्यात आली. याशिवाय ते गोंदीया व परभणी या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री होते.

गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मलिक आता बिनखात्याचे ‘नवाब’

विरोधी पक्षाकडून नवाब मलिक यांच्या अटकेनंतर टीकेचा भडीमार सुरु झाला. यात सरकारची छबी खराब झाली त्यानंतर आता ठोस निर्णय घ्यावाच लागणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळून चुकले. त्यानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली व नवाब मलिकांची पदे काढण्यात आली. या बैठकीत ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *