वर्षाला घरगुती वापरासाठी ३ गॅस सिलिंडर मोफत देणार ; या राज्याचा निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ मार्च । वर्षाला घरगुती वापरासाठी तीन गॅस सिलिंडर मोफत देणार्‍या योजनेस राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 28) पहिल्याच बैठकीत मान्यता दिली. ही योजना अधिसूचित केली जाईल. यासाठी उत्पन्नाची मर्यादा व अन्य तपशील ठरवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. एप्रिलपासून ही योजना लागू केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.

बांबोळी येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी (दि. 28) दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय गाठले. त्यांनी रितसर आपल्या पदाचा ताबा घेतला. राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेला स्वयंपूर्ण गोव्याची जोड दिली आहे.

गावे स्वावलंबी झाल्याशिवाय राज्य स्वयंपूर्ण होणार नाही. यासाठी 191 ग्रामपंचायत क्षेत्रात स्वयंपूर्ण गोवा योजना राबवणे सुरू केले आहे. आता अधिक नेटाने ती मार्गी लावण्यात येईल. कोव्हिड काळात इतर राज्यांवर दैनंदिन गरजांसाठीही राज्य किती अवलंबून आहे हे समजून चुकले होते. गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षानंतरतरी गोवा सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असावा, असा ध्यास बाळगण्यात काहीच चूक नाही.

राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मदतीने आम्ही सारे मिळून त्यात यश मिळवू. ही केवळ सरकारी योजना नाही तर ती लोकचळवळ आहे. त्यात प्रत्येक गोमंतकीयाने सहभागी झाले पाहिजे. व्यवसाय सुलभता निर्देशांकात राज्याला वरचा क्रमांक मिळण्यासाठी पावले टाकण्यात येत आहे. उद्योग, व्यवसाय क्षेत्राने राज्य सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाकडेही सरकार लक्ष पुरवणार आहे.

राज्याने देशाची पर्यटन राजधानी अशी ओळख निर्माण करावी यासाठी या क्षेत्राच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत. राज्यात बंद पडलेल्या खाणी सुरु कऱण्यात येणार आहेत. संकल्पपत्रात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाणार आहेत. आमच्यासाठी ती केवळ आश्वासने नसून ते जनतेला दिलेले वचन आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *