Maharashtra: राज्यावर दुहेरी संकट, बाहेर उन्हाचा चटका घरात विजेचा लपंडाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ मार्च । दोन वर्षांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचं संकट होतं. आता लसीकरण ही मोठ्या वेगाने सुरू आहे आणि कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोनाच्या या संकटातून मुक्तता होत असतानाच आता महाराष्ट्रावर दोन नवी संकटे घोंगावत आहेत. (double crises on Maharashtra)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यानुसार, 29 मार्च 2022 रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे.

महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता

उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असतानाच दुसरं संकट महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि ते म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचं. राज्यातील वीज कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. आज वीज कर्मचारी संघटना आणि ऊर्जामंत्री यांच्यात एक बैठक होणार होती. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवल्याने ऊर्जामंत्र्यांनी आपली नियोजित बैठक रद्द केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा दिला.

वीज कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यासोबतच संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाली. त्यामुळे राज्यावर विजेचे संकट आले आहे. राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संप सुटला तरी लोडशेडिंगचे संकट मिटणार नाही. कारण कोल इंडियाच्या युनियन देखील संपावर गेले आहे. त्यामुळे पुढची दोन दिवस राज्याला कोणताही कोळशाचा पुरवठा होणार नाही. परिणामी महानिर्मिती आणि एनटीपीसी दोघांचेही औष्णिक विद्युत केंद्र कोळसा अभावी प्रभावित होणार आहे.

महानिर्मिती रोज कोल इंडिया कडून 1 लाख 30 हजार मॅट्रिक टन कोळसा विकत घेते. दोन दिवस यातला एक टन कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील पारस, नाशिक, परळी व भुसावळ या केंद्रावरील 1900 MV वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनटीपीसीच्या केंद्राची आहे राज्य सरकारला रोज पाच हजार मेगावॅट वीज मिळते मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांची वीज निर्मिती देखील प्रभावित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *