महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ एप्रिल । एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक खिळखिळी झाली असताना आता एसटी टिकवण्यासाठी खासगी वाट धरण्यात आली आहे. संपकरी सेवेत परतण्याची वाट न पाहता मुंबईतील ‘बेस्ट’ पॅटर्ननुसार महामंडळाची सेवा चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यानुसार प्रतिकिलोमीटर दराने ग्रामीण भागात १२ हजार मार्गांवर खासगी बस चालवण्यात येणार आहे. विद्युत बससाठी ५६ ते ६० रुपये प्रति किलोमीटर खर्च करण्याची महामंडळाची तयारी आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या पाच महिन्यांपासून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तालुका आणि ग्रामीण भागांत संपाची झळ सर्वाधिक बसत असल्याने आता महामंडळाने या मार्गांवर प्रवासीसेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एसटी महामंडळ आता मुंबईच्या ‘बेस्ट’ पॅटर्नवर चालणार आहे. ‘ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यासाठी ११ हजार चालक, वाहक भरतीचे कंत्राट तयार करण्यात आले आहे. आज, शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरू होईल. राज्यातील संपूर्ण वाहतूक कशी सुरू करावी, याचे नियोजन महामंडळाकडे तयार आहे. यासाठी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. संपकरी कर्मचाऱ्यांची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर गाड्या सुरू करण्यात येतील,’ असे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
मध्यम-लांब पल्ल्याच्या मार्गावर म्हणजेच ग्रामीण भागातील मार्गासाठी तब्बल १२ हजार खासगी बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या बस प्रति किलोमीटर दराने असतील. गाडीचे इंधन, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी खासगी कंपनीची असणार आहे. महामंडळाच्या ताब्यातील कार्यशाळा खासगी कंपनीच्या मदतीने चालवण्याची तयारीही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महामंडळाच्या खर्चात मोठी घट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या डिझेलवर धावणाऱ्या आणि भविष्यात विजेवर धावणाऱ्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. एसटीच्या शिवाई या विद्युत बससाठी ५६ ते ६० रुपये प्रति किलोमीटर दर देण्याची तयारी महामंडळाने केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
देशातील सार्वजनिक परिवहन सेवेचा विचार केला असता एका गाडीमागे ४ कर्मचारी आहेत. एसटी महामंडळात हे प्रमाण ५-६ इतके आहे. महामंडळात नव्या गाड्या आगामी सहा ते आठ महिने तरी येण्याची चिन्हे नाहीत.
५० हजार कर्मचारी संपावर ठाम
८४ हजार कर्मचाऱ्यांपैकी सध्या ३४ हजार कर्मचारी कामावर उपस्थित आहेत. यात चालक-वाहकांची संख्याकेवळ १३ हजार आहे. २१ हजार कर्मचारी कार्यालय, यांत्रिक विभागातील आहे. ५० हजार कर्मचारी संपावर ठाम असून १० हजार कर्मचारी बडतर्फ आहेत.