Emergency in Sri Lanka: श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर; आणीबाणी जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ एप्रिल । स्वातंत्र्यानंतर श्रीलंका पहिल्यांदाच भीषण परिस्थितीत पोहोचली आहे. आर्थिक परिस्थिती एवढी कोसळली आहे की, संतापलेले लोक आता श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे घर जाळण्यासही मागेपुढे पाहत नाहीएत. यामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे य़ांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

देशाची सुरक्षा आणि आवश्यक सेवांच्या पुरवठ्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. एक एप्रिलपासूनच आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय राष्ट्रपती राजपक्षे यांनी अशा वेळी घेतला आहे, जेव्हा देशात त्यांच्या आणि त्यांच्या सरकारविरोधात निदर्शनं तीव्र झाली आहेत. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, तेव्हापासून राष्ट्रपतींविरुद्ध लोकांचा रोष उफाळून येत आहे. गुरुवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक निदर्शनेही झाली. परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा वापर केला, लाठीमारही केला.

श्रीलंकेच्या विविध भागात निदर्शने सुरु आहेत. पोलिसांशी चकमक होत आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात असून जमिनीवरील वातावरण तणावपूर्ण आहे. विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे, देशाला तासनतास अंधारात राहावे लागत आहे. बस आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिलिंग स्टेशनवर आता डिझेल शिल्लक नाही. श्रीलंकेतील सार्वजनिक वाहतूक सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेच महागाईचा दर १७ टक्क्यांहून पुढे गेला आहे. यामुळेच श्रीलंकसमोर आता गंभीर संकट निर्माण झालं आहे. एक कप चहासाठी १०० रुपये द्यावे लागत आहेत. तर ब्रेड, दूध यासारख्या पदार्थांसाठी देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट १५० रुपयांना तर एक किलो दूध पावडर १९७५, एलपीजी सिलिंडर ४११९, पेट्रोल २५४ तर डिझेल १७६ रुपये प्रति लीटर आहे. श्रीलंका सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक सर्वच सामान हे अत्यंत महाग झालं आहे. जर या किमती अशाच राहिल्या तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार याची आता लोकांना खूप भीती वाटू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *