महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ एप्रिल । गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली. नितीन गडकरी हे रविवारी रात्री राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. शिवसेना, राष्ट्रवादीवर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले.
त्यांना भेटीबद्दल विचारले, असता ते म्हणाले की, अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असते, असे नाही. त्यावर आम्ही बोलावे असे काही नाही. दरम्यान युतीच्या शक्यतेबद्दल विचारलं असता त्यांनी त्याविषयी फार काही बोलावे, अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई, असं उत्तर दिले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका ताकदीने लढेल. मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कितीही असंतृष्ट आत्मे एकत्र आले, मराठी माणसे, मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कितीही कटकारस्थाने केली तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही मुंबई पालिकेवरचा भगवा झेंडा कायम ठेवू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचली, तरी काही फऱक पडत नसल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले.