मशीद,भोंगा शब्द ऐकल्यावर आव्हाडांच्या अंगात संचारतं; मनसेचा पलटवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ एप्रिल । मशीद, भोंगा, मुसलमान असे काही शब्द ऐकले की गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अंगात संचारते. आपल्या मतदारसंघावरील प्रेम दाखवण्यासाठी आणि मतदारांची नाराजी ओढवू नये यासाठी खटाटोप करत असल्याची टीका मनसे (MNS) ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाडवा मेळाव्यापासून सुरू झालेल्या वादाचे पडसाद येत्या काही दिवसांमध्ये ठाण्यातही उमटण्याची चिन्हे आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या मदरशांमध्ये धाड टाकण्याच्या वक्तव्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेत एक वस्तरा सापडला तरी राजकारण सोडून देईन, असे आव्हान दिले होते. तसेच राज ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली होती.

या टीकेला मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात दंगली घडतील असे काही नेत्यांना वाटत आहे; मात्र ठाण्यात राबोडी असो वा भिवंडी, अनेकदा दंगली घडल्या आहेत. भिवंडीत घडलेल्या दंगलीत दोन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला, तेव्हा आव्हाड यांना पुळका नाही आला. खरे तर दंगली राष्ट्रवादीला घडवायच्या आहेत, असेही वक्तव्य अविनाश जाधव यांनी केले आहे.

ठाण्यातही हनुमान चालिसा लावणार

राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ठाण्यातील मशिदीवरील भोंगे काढले गेले नाहीत, तर मनसेकडून परिसरात मोठमोठे डीजे आणि भोंगे लावून हनुमान चालिसा लावली जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *