आता ठाण्यात सभा , विरोधकांच्या आरोपांना आणि कार्यकर्त्यांच्या संभ्रमांना उत्तरं देणार ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ एप्रिल । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढी पाडव्याच्या जाहीर सभेचा धुरळा आणखी खाली बसत नाही, त्यांच्या भाषणाची चर्चा थांबत नाही तोच आता त्यांची दुसरी जाहीर सभा होतीय. ९ एप्रिल रोजी ठाण्यामध्ये राज ठाकरे सभा घेणार आहेत. आक्रमक आणि ज्वलंत हिंदुत्वाचा स्वीकार करत राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार, हनुमान चालिसा, अशा भूमिका मांडल्या. ज्यावरुन विरोधकांनी राज ठाकरेंवर चौफेर हल्ला चढवला. आता विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता राज ठाकरे यांची ठाण्यात ९ एप्रिलला जाहीर सभा होतेय.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या समोरील रोडवर राज ठाकरे यांची सभा होतीय. सभेची तयारी देखील सुरु झाली आहे. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सभेसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणावरुन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये खदखद आहे. काल (सोमवारी) तर पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले. दुसरीकडे पक्षाचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर यांनाही राज ठाकरे यांची नवी भूमिका अनाकलनीय वाटतीय. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाने राज ठाकरे यांची सभा आयोजित केलीय. ज्या सभेतून ते आपली भूमिका अधिकाधिक स्पष्ट करुन मांडतील.

राज ठाकरे यांच्या भाषणाचा विपर्यास केला गेला आहे. सरकारने जर मशिदीवरचे अनधिकृत भोंगे काढले नाहीत तर कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा मोठ्या आवाजात लावावी, असं राज ठाकरे म्हणाले होते. पण कार्यकर्त्यांनी आधीच आक्रमक भूमिका घेतली. इतरही काही मुद्द्यांवरुन कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सभा घेणार आहेत, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दुसरीकडे राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढविताना भाजपला सॉफ्ट कॉर्नर दाखवला. भाजपविरोधात त्यांनी एकही शब्द काढला नाही. त्यांच्या या नव्या भूमिकेवरुन विरोधकांना त्यांना अनेक सवाल केले. त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रंगबदलू राज ठाकरेंची नवी भूमिका म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणे साधले. विरोधकांना या सगळ्या प्रश्नांना राज ठाकरे ठाण्यातील सभेत उत्तरं देतील. तसंच भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर देखील ते स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *