महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । ईडीने संजय राऊतांवर (Sanjay Raut) कारवाई केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) INS विक्रांतची फाईल उघडली. याप्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यानंतर आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्या पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR Filed Against Kirit Somaiya in INS Vikrant Case)
लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान सुरू केले होते. या अभियानातून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यापालांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केला, असा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर आहे. याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला नाही. आम्ही राज्यपाल कार्यालयाकडून माहिती मागवली होती. पण, त्यात हा निधी जमा झाला नाही, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगितलं. सोमय्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांहून निधी गोळा केला होता. जवळपास ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. यामध्ये इतर भाजप नेत्यांचा देखील समावेश आहे. पण, किरीट सोमय्या हे मुख्य सूत्रधार आहेत. यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे, असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केले.
INS विक्रांत या युद्धनौकेन भारत-पाकिस्तान युद्धात मोठी भूमिका बजावली होती. या आयएएनस विक्रांतची देखभाल करण्यास सरकारने असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर त्याचा लिलाव न करता त्याचे संग्रहालयात रुपांतर करावे, अशी मागणी झाली होती. INS विक्रांतला वाचविण्यासाठी सोमय्यांनी सामान्य नागरिकांकडून निधी गोळा केला होता. पण, हा निधी राज्यपाल कार्यालयात पोहोचलाच नाही. त्यामुळे आता सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.