महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. सहा) दुपारी गोवर्धन घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बियाणी यांच्या कुटुंबियांसह पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास संजय बियाणी यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सर्व व्यापाऱ्यांनी नांदेड बंदची हाक दिली होती. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला आले तर दिल्लीहून खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडला आले. त्यांनी बियाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या अंत्ययात्रेत ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, अॅड. निलेश पावडे, मारोती कंठेवाड, बालाजी कंठेवाड, चंद्रकांत पाटील, संतोष पांडागळे यांच्यासह शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक आदी सहभागी झाले होते.
गोवर्धन घाट येथे शोकसभा घेण्यात आली. संजय बियाणी यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ते दृष्य पाहून मी रात्रभर झोपू शकलो नाही. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून मी आढावा घेतला असून निपक्षपातीपणे चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
खासदार चिखलीकर यांनी खरा सूत्रधार शोधून काढल्याशिवाय उद्योजकांमधील भय दूर होणार नाही, असे सांगत घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी असल्याचे सांगितले. आमदार कल्याणकर यांनी एक चांगल्या उद्योजकाची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरीत पकडून कठोर कारवाई करण्यामध्ये शासन कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते खतगावकर यांनी बियाणी हे व्यावसायिक असूनही सामाजिक प्रश्नांची जाण होती. उद्योजकाचा मृत्यू हळहळ करायला लावणारा असल्याचे त्यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी देखील भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी संजय बियाणी यांच्या पत्नीने टाहो फोडला. प्रशासनावर आरोप करत आधी सुपारी देणाऱ्या मुख्य आरोपीस पकडा व नंतर इतरांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. बुधवारी सकाळी बियाणी यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. त्यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.