महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल ।
मेष : आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा
नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च आटोक्यात ठेवा. १३ एप्रिल रोजी गुरू मीन राशीत प्रवेश करेल. तुम्हाला बारावा गुरू चालू होत आहे. तेव्हा बाराव्या गुरूची झळ आता सोसावी लागणार आहे. ही झळ कमी करण्यासाठी कोणतेही काम सतर्क राहून करणे गरजेचे राहील. आवाक्याबाहेर कोणतीही गोष्ट नाही केल्यास, बाराव्या गुरूचा त्रास फारसा जाणवणार नाही. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत प्रवेश करेल. दिनांक १५, १६ रोजीचे दिवस आपल्या हातचे नाहीत. बाकी राहिलेले सप्ताहातील दिवस चांगले जातील. व्यावसायिकदृष्टय़ा बदल करणे टाळा. उत्पादन वाढवू नका. सामाजिक क्षेत्रात मन लागणार नाही. घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल. मात्र स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
महिलांसाठी : स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक : १२, १३
वृषभ : आठवडा चौफेर प्रगती
मनोकामना पूर्ण करणारा गुरू निश्चितच उंच शिखरावर पोहोचवेल. सध्या ग्रहमानाची साथ उत्तम मिळणारी आहे. शिवाय १३ एप्रिल रोजी होणारा गुरुबदल तुमच्या लाभस्थानात येत आहे. मागील वर्षी बाकी राहिलेल्या कामांचा शुभारंभ होणार आहे. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत प्रवेश करेल. सगळेच दिवस सारखे नसतात याचा अनुभव मात्र येईल. व्यवसायात स्वत:हून नवीन परिवर्तन कराल. ते खूप फायद्याचे ठरेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. आर्थिकदृष्टय़ा चौफेर प्रगती राहील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व गाजवाल. भावंडांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या. मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टींची वेळेत पूर्तता होईल. कुटुंबातील रुसवेफुगवे मिटलेले असतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्याची तंदुरुस्ती वाढेल.
महिलांसाठी : स्वत:चे महिलांसाठी : तुम्ही केलेल्या कार्याचे कौतुक होईल.
शुभ दिनांक : १५, १६
मिथुन : इच्छा आकांशा पूर्ण होणार
आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आवडीचे काम कराल. नातेवाईकांकडून शुभेच्छा मिळतील. घरगुती वातावरण हसतेखेळते राहील.दिनांक १३ एप्रिल रोजी गुरू मीन राशीत प्रवेश करेल. तो तुमच्या दशमस्थानात असेल. चांगल्या वेळेची वाट पाहावी लागणार नाही. समोरून आलेली संधी सोडू नका. हा गुरू अनेक मार्गातून राजयोग निर्माण करेल. इच्छा फलद्रूप होईल. लाभस्थानात रवी १४ एप्रिल रोजी प्रवेश करत आहे. पौर्णिमाकाळात जबाबदारी पार पाडाल. छोटय़ा व्यवसायाचे स्वरूप मोठय़ा प्रमाणात करता येईल. त्यासाठी इतरांची मदतही मिळेल. हाताखाली असलेल्या कामगार वर्गाची संख्या वाढेल. उत्पादनातील गुंतवणूक वाढवणे अवघड वाटणार नाही. नोकरदार वर्गाला मिळालेली बढती समाधानकारक असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
महिलांसाठी : मानसिक स्वास्थ्य लाभेल.
शुभ दिनांक : ११, १३
कर्क : मनासारखे यश मिळणार
व्यवसायात कितीही कष्ट केले तरी मनासारखे यश येत नव्हते. सध्या ही परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे कष्ट असले तरी कामात उत्साहच वाटेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास राहणार नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. मीन राशीत प्रवेश करणारा गुरू १३ एप्रिल रोजी तुमच्या भाग्यस्थानात येत आहे. आठव्या गुरूची तीव्रता नष्ट होणारी आहे. भाग्यस्थानातील गुरूचा प्रभाव मात्र जोरदार फळे देईल. चांगल्या गोष्टींची घाई करायला हरकत नाही. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशी दशमस्थानात प्रवेश करेल. पौर्णिमा पराक्रमस्थानातून होत आहे. राजकीय क्षेत्रात अधिकार प्राप्त होईल. भावंडांशी संवाद घडेल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहाल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रकृतीत सुधारणा घडतील.
महिलांसाठी : स्वत:चे म्हणणे खरे कराल.
शुभ दिनांक : १०, ११
सिंह : अनावश्यक गोष्टीना फाटा द्या
पौर्णिमाकाळात काम जपून करा. दिनांक १०, ११ रोजी व्यक्ती जवळची असो किंवा लांबची जास्त जवळीकता साधण्याचा प्रयत्न करू नका. जेवढय़ास तेवढे राहा. अनावश्यक गोष्टी टाळा. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य कारणी लावा. स्पर्धेच्या मागे लागू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष घालू नका. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. कुटुंबाला विश्वासात घ्या. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.१३ एप्रिल रोजी गुरू मीन राशीत तुमच्या अष्टमस्थानात प्रवेश करेल. या आठव्या गुरूचा प्रवास हा चढ-उताराचा राहील. तेव्हा ज्या गोष्टीतून त्रास वाटेल अशा गोष्टी न केलेल्या चांगल्या. आठव्या गुरूची धास्ती घेण्यापेक्षा स्वत:वर नियंत्रण ठेवल्यास त्रासाचा कालावधी कमी होईल. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत भाग्यस्थानात प्रवेश करेल.
महिलांसाठी : इतरांच्या सल्ल्याने काम करू नका.
शुभ दिनांक : १३, १४
कन्या : नातेसंबंध मजबूत होतील
कुटुंबातील हेवेदावे दूर होतील. धार्मिक गोष्टीत उत्साह राहील. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या. मीन राशीत प्रवेश करणारा गुरू १३ एप्रिल रोजी तुमच्या सप्तमस्थानात येईल. खोळंबलेल्या गोष्टींचे मार्ग मोकळे होतील. विनाकारण होणारा त्रास कमी होईल. १४ एप्रिल रोजी रवी मात्र अष्टमस्थानात मेष राशीत प्रवेश करीत आहे. पौर्णिमा तुमच्या राशीत होत आहे. दिनांक १२, १३, १४ रोजी प्रसिद्धीच्या मागे लागून भलतीच गोष्ट करू नका. इतरांनी सांगितले म्हणून केले असे करणे त्रासाचे राहील. स्वत:च्या हिताचा विचार करा. व्यवसायातसुद्धा व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष द्या. जास्तीचा व्याप वाढवू नका. नोकरदार वर्गाला मर्यादित कामे करावी लागतील. आर्थिक बाबतीत धाडसी निर्णय टाळा. सामाजिक माध्यमांचा वापर करताना भान ठेवा.
महिलांसाठी : संयम राखणे हिताचे असेल.
शुभ दिनांक : १०, १५
तूळ : नियोजन यशाची पायरी असेल.
नियमाचे पालन करावे लागेल पत्रकार, ज्योतिषी, वकील इत्यादी व्यवसायिकांनी बोलताना उग्र प्रतिक्रिया देऊ नका. नोकरदार वर्गाला कामाचा आराखडा तयार करावा लागेल. गुरू १३ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करत असून, तो तुमच्या राशीस सहावा असेल. या गुरूचे भ्रमण अनुकूल करण्यासाठी प्रयत्न करा. आहे त्या परिस्थितीला स्वीकारणे हीच या गुरूची अनुकूलता असेल. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत प्रवेश करेल. दिनांक १५ , १६ रोजीचे दिवस शांततेत पार पाडा.टोकाची भूमिका टाळा. स्वत:चेच म्हणणे खरे करण्यात वेळ घालवू नका. पौर्णिमा कालावधीत वादविवादापासून लांब राहा.आर्थिकदृष्टय़ा नियोजन हवे. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.
महिलांसाठी : चर्चासत्रात आघाडी घेऊ नका.
शुभ दिनांक : १२ , १३
वृश्चिक : आर्थिकदृष्टय़ा गुंतवणूक वाढेल.
व्यावसायिकदृष्टय़ा हातून निसटलेल्या गोष्टी पुन्हा रुळावर येणार आहेत. व्यापारीवर्ग संतुष्ट असेल. नोकरदार वर्गाला कामकाजाबद्दल श्रेय मिळेल. आर्थिकदृष्टय़ा गुंतवणूक वाढेल. सामाजिक क्षेत्रात उत्साह वाटेल १३ एप्रिल रोजी गुरू मीन राशीत पंचम स्थानात प्रवेश करेल. हा गुरू प्रगतीशाली दिवस दाखवणार आह. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अपेक्षापूर्तीचा लाभ होईल. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत षष्ठस्थानात प्रवेश करेल. चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. लाभस्थानातून पौर्णिमा होत आहे. सप्ताहातील सगळेच दिवस चांगले जाणार आहेत. मित्र परिवारासोबत करमणूक घडेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिकदृष्टय़ा स्वास्थ्य चांगले राहील.
महिलांसाठी : सप्ताह आनंददायक असेल.
शुभ दिनांक : १० , १६
धनू : जबाबदारी चे भान ठेवा
ज्याना व्यवसायाची नवीन सुरुवात करावयाची होती त्याचा श्रीगणेशा होईल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्टय़ा अचानक धनलाभ राहील.१३ एप्रिल रोजी गुरू मीन राशीत चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. हा चतुर्थातील गुरू सुखाची अनुभूती देणारा ठरेल. स्वप्नवत गोष्टी पूर्ण होतील. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत पंचम स्थानात प्रवेश करेल. पौर्णिमा काळात महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दिनांक १० , ११ रोजी सगळेच काही चांगले असताना मुद्दामहून जुना वाद उकरून काढू नका. स्वत:ला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हे दोन दिवस जेवढे शांत राहता येईल तेवढे राहा. बाकी दिवस चांगले जातील. कुटुंबातील हेवेदावे दूर ठेवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
महिलांसाठी : स्वत:साठी वेळ द्या.
शुभ दिनांक : १२ ,१३
मकर : नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना प्रस्ताव येतील .
नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना प्रस्ताव येतील . आर्थिक कुचंबणा कमी होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मीन राशीत प्रवेश करणारा गुरू १३ एप्रिल रोजी तुमच्या पराक्रमस्थानात येत आहे. चांगल्या गोष्टींसाठी धाडस वाढेल. अपेक्षित प्रतिसाद मिळेल. कामे मार्गस्थ होतील. १४ एप्रिल रोजी रवी चतुर्थस्थानात प्रवेश करेल. पौर्णिमा भाग्यस्थानातून होत आहे. पौर्णिमा कालावधीत आनंदाची बातमी कानावर येईल. दिनांक १२ , १३ , १४ रोजी मात्र सहनशीलता ठेवून कोणतीही गोष्ट करावी लागेल. हे मात्र विसरू नका. नकारार्थी घंटा मनातून काढून टाका. उद्याचे काम आजच करण्याची तयारी करा. व्यवसायात निर्माण होणाऱ्या संधीत घाईचा निर्णय टाळा.
महिलांसाठी : द्विधा अवस्था टाळा.
शुभ दिनांक : १० , ११
कुंभ : आर्थिक बाबतीत खर्च आटोक्यात ठेवा.
पौर्णिमा अष्टमस्थानातून होत आहे. चंद्राचे भ्रमण हे षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. तेव्हा उचलली जीभ टाळय़ाला लावली असे करून चालणार नाही. माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल वाच्यता करू नका. त्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. बोलून त्रास वाढवून घेण्यापेक्षा केव्हाही न बोललेले चांगले. व्यावसायिकदृष्टय़ा झुकते माप स्वीकारावे लागेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्कता बाळगली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. आर्थिक बाबतीत खर्च आटोक्यात ठेवा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. १३ एप्रिल रोजी होणारा गुरू बदल तुमच्या धनस्थानात येत आहे. कितीही बचत करून गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट होत नव्हती. सध्या हा गुरू गुंतवणुकीतून लाभ देणारा आहे.
महिलांसाठी : सहनशीलता ठेवा.
शुभ दिनांक : १२ , १३
मीन : आर्थिकदृष्टय़ा बचत करा.
व्यावसायिक हतबल परिस्थिती दूर होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. कुटुंबाशी मिळून-मिसळून राहाल. उपासना फलद्रूप होतील. जुन्या विकारांकडे वेळीच लक्ष द्या. १३ एप्रिल रोजी प्रवेश करणारा गुरू तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे. इतक्या दिवस असलेली टांगती तलवार आता दूर होणारी आहे. चांगले दिवस बघायला मिळतील. गुरूचा प्रतिसाद उत्तम राहील. १४ एप्रिल रोजी रवी मेष राशीत धनस्थानात प्रवेश करेल. पौर्णिमा सप्तमस्थानातून होत आहे. सहकाऱ्यांकडून अपेक्षित कामे होऊ लागतील. दिनांक १२ , १३ , १४ रोजी मात्र आतापर्यंत ठेवलेले नियंत्रण सोडू नका. या कालावधीत कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. नियम पाळा.
महिलांसाठी : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा.
शुभ दिनांक : १० , ११