Amway ला झटका ; ईडीकडून मोठी कारवाई ; कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । अंमलबजावणी संचालनालयानं (Enforcement Directorate) ॲमवे (Amway) कंपनीला जोरदार झटका दिला आहे. अ‍ॅमवे इंडिया या मल्टी लेव्हल मार्केटिंग ( multi-level marketing, एमएलएम ) योजनेचा प्रचार करणाऱ्या कंपनीच्या 757 कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीनं सोमवारी निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे. न्युज १८ लोकमतने या विषयी बातमी दिली आहे . 

ईडीकडून मुंबईतील बँक व्यवहारासह एकूण 757 कोटी 77 लाख रुपयांची कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 411.83 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच 36 बँक खात्यांतील 345.94 कोटी रुपये जप्त केले आहेत. अ‍ॅमवे एन्टरप्राइजेस प्रा. लि.च्या टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये तमिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील जमीन आणि कारखान्याची इमारत , प्लांट , मशिनरी , वाहने , बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश असल्याचं तपास संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिरॅमिड रचनेद्वारे देशभरात तब्बल साडेपाच लाख वितरक-एजंन्ट यांच्या माध्यमातून उत्पादनांची थेट विक्री करण्याच्या नावाखाली बंदी असलेल्या मल्टी लेव्हल मार्केटिंगचे व्यवहार ॲमवेनं केल्याचं आढळून आलं आहे.

ईडीनं काय म्हटलं निवदेनात

ग्राहकाला उत्पादनांची थेट विक्री केल्यास मिळणाऱ्या घसघशीत कमिशनवर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवलं जात होते. कंपनीचे सदस्य उत्पादनांची विक्री करतानाच नवे सदस्य जोडत अधिक कमिशन प्राप्त करण्यासाठी काम करत राहतात. सदस्यांना द्याव्या लागणाऱ्या कमिशनमुळे बाजारातील स्पर्धक उत्पादनांपेक्षा कंपनीच्या किंमती जास्त आहेत. केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण (थेट विक्री) 2021 नियमांतर्गत अशा विक्रीवर बंदी घातली आहे.

ईडीची कारवाई सन 2011 च्या तपासासंदर्भात आहे. कंपनीने 2002-03 ते 2021-22 या वीस वर्षांच्या कालावधीत एकूण 27 हजार 562 कोटी रुपये व्यवसायातून मिळविले आणि यापैकी 7,588 कोटी रुपये कमिशनपोटी वितरक आणि सदस्यांना तसंच भारत, अमेरिकेतील एजंटांना दिले, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली. याप्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गतही तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *