महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । मंगळवारी शिवसेना भवनात झालेल्या एका बैठकीत महाविकास आघाडीचे पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या भेटीबाबत निर्णय झाल्याचे समजते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी आदित्य यांची अयोध्या भेट अगोदरच ठरली होती पण कोविड प्रतिबंधामुळे आम्ही जाऊ शकलो नाही असे सांगितले. आदित्य यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि येत्या ४-५ दिवसात या दौर्याची आखणी होत आहे असे सांगून राउत यांनी अयोध्येमध्ये एक सभा घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रात सध्या कुणाचे हिंदुत्व अधिक खरे यावरून घमासान माजली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अधिक प्रखरपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसत आहेत. भाजपच्या हिंदुत्वाचा सतत उल्लेख करताना राज यांनी स्वतः हातात भगवा घेतला असून ५ जून रोजी राज्याच्या विविध भागातील १० हजार मनसे कार्यकर्त्यांच्या बरोबर अयोध्या भेटीचा कार्यक्रम त्यांनी घोषित केला आहे. त्यासाठी डझनावारी रेल्वे बुक केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य यांची अयोध्या भेट ठळकपणे समोर आणली गेली आहे.
संजय राउत या वेळी म्हणाले डिसेंबर १९९६ मध्ये बाबरी मशीद विवादित इमारत पाडताना शिवसैनिकांनी त्यांचे प्राण दिले आहेत. आमचे हिंदुत्व भाड्यावर मिळत नाही. उद्धव ठाकरे एप्रिल २०२० मध्ये अयोध्येला जाऊन प्रार्थना करून आले होते आणि २०१८ मध्ये भाजपने राम मंदिर बनविण्याचे आश्वासन दिले त्याची आठवण करून देण्यासाठी सुद्धा अयोध्येला गेले होते.