महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२२ एप्रिल । इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया हे देश आणि पाकिस्तानातील जाकोबाबाद शहरातील तापमान उन्हाळ्यात मनुष्यासाठी असह्य असते. तर भारतात राजस्थानातील जैसलमेर, श्रीगंगानगर ही शहरांमध्ये प्रचंड तापमान असते. मात्र, बुधवारी ब्रह्मपुरीने जागतिक तापमानात उच्चांकी झेप घेतल्यानंतर आज चंद्रपुरावर सूर्याने आग ओकली. गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४५.४ एवढे होते. हे जगात सर्वाधिक होते.
विदर्भातील उन्हाच्या लाटेचा प्रभाव आज अपेक्षेप्रमाणे ओसरला. ढगाळ वातावरणामुळे चंद्रपूरचा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. काल जगात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या ब्रह्मपुरीचा पारा १.३ अंशाने घसरून ४४ वर आला. अकोल्याच्याही कमाल तापमानात २.३ अंशांची घट झाली.
नागपूरसह इतरही जिल्ह्यांतील पारा खाली आला. विदर्भात एकीकडे तापमानात घट होत असताना चंद्रपूरच्या पाऱ्याने मात्र अचानक उसळी घेतली. येथे नोंदविण्यात आलेले ४५.४ अंश सेल्सिअस तापमान जगात सर्वाधिक ठरले. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या एल डोरॅडो या संकेतस्थळावर करण्यात आली. विदर्भातील यंदाच्या उन्हाळ्यातीलही हे सर्वाधिक तापमान होते.