महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । सातारा शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने प्रचंड उकाडा वाढला होता. ढगाळ वातावरणामुळे कडक उन्हाचा त्रास तुलनेत कमी झाला. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पण हा पाऊस थोडा वेळ पडून थांबल्याने उकाडा असह्य झाला. सातारा शहराच्या पश्चिम भागात कास, बामणोली परिसरात गारांसह पाऊस झाला. पावसाने साताऱ्यात राजवाडा, राधिका रोड, नगरपालिका चौक परिसरात पाण्याची तळी साचली होती. शहराच्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उकाडा आणखीनच त्रासदायक झाला. उशिरा काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, तसेच मोठ्या फांद्या पडल्यामुळे अनेक भागांत वीज रात्री उशिरापर्यंत गेलेलीच होती. जोराच्या वाऱ्यामुळे कैऱ्या पडल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथील भिलार या भागात जोरदार गारपीट झाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. वारा सुटल्याने सुमारे एक तासाहून अधिक काळ वीज गायब झाली होती. अचानक पाऊस आल्याने महाबळेश्वर मार्केटमध्ये पर्यटकांची धावपळ उडाली.