महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी येथील सोहळ्यात प्रदान करण्यात आला. मात्र, सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून लगोलग वाद सुरू झाला आहे. निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नव्हते,असे सांगण्यात येते. यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख उपस्थिती म्हणून उषा मंगेशकर यांचे नाव होते. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला गेले नसल्याचे समजते. हा कार्यक्रम सरकारी नसून घरगुती आहे, असे स्पष्टीकरण मंगेशकर कुटुंबीयांनी यापूर्वीच दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जात होता त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चंद्रकला शिंदे या ८० वर्षीय शिवसैनिक आजीच्या घरी जात त्यांचे आशीर्वाद घेतले. चंद्रकला शिंदे या परवा मातोश्रीबाहेरच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्याबद्दल ठाकरे कुटुंबीयांनी त्यांच्या घरी जाऊन चंद्रकला आजीचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले तेव्हा मुंबई उपनगरचे पालकमंत्री व राजशिष्टाचार मंत्री या नात्याने आदित्य ठाकरे स्वागताला उपस्थित होते.