महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । इंधनदरवाढीसह सर्वच खाद्यान्नाच्या दरात सतत वाढ होत आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांना खाद्यतेलाच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालताच दोन दिवसात खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो १५ ते १६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे २५०० रुपयांचा असलेला सोयाबीन तेलाचा (१५ किलो) डब्बा २७०० ते २७५० रुपयांवर पोहचला आहे. शेंगदाण्याच्या तेलात दरात किंचित वाढ झाली असून २६५० रुपयावरुन २७५० रुपये (१५ किलो डब्बा) झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि शेंगदाणे तेलाचे दर एका पातळीवर आले आहे. (Food Oil Price Hike News Updates)
इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. तर मलेशिया दुसऱ्या क्रमांकावर येते. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने भारतातील पामतेलाच्या आयातीवर वाईट परिणाम होणार आहे. भारताला आता मलेशियावर अवलंबित्व वाढवावे लागणार आहे. निर्यातीवर निर्बंध आल्याने त्याचा थेट फटका महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना बसणार आहे.